परदेशात नोकरीच्या आमिषाने सव्वातीन लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

बेळगाव - परदेशात नोकरीला पाठवून तिथे भलत्याच कंपनीत बिनपगारी नोकरी लावून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिराजअली अब्दुलकादिर खान (वय ४३, टिपू सुलताननगर, मच्छे) असे संशयिताचे नाव आहे.

बेळगाव - परदेशात नोकरीला पाठवून तिथे भलत्याच कंपनीत बिनपगारी नोकरी लावून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिराजअली अब्दुलकादिर खान (वय ४३, टिपू सुलताननगर, मच्छे) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत मार्केट पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिराजअलीने मार्केट पोलिस ठाण्याला लागूनच परदेशात नोकरी लावणारी कंपनी सुरू केली होती. हुनशीकट्टीतील पाच तरुणांनी त्याला भेटून नोकरी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांची सर्व कागदपत्रे जमा करून या सर्व तरुणांकडून त्याने ३ लाख २५ हजार रुपये घेतले.

या सर्वांना मलेशियात एका नामांकित मोबाईल कंपनीत नोकरी लागल्याचे सांगून त्यांना तशी नियुक्तीपत्रेही दिली. परंतु तेथे गेल्यानंतर त्यांना भलत्याच कंपनीत काम करावे लागले. तेथे दोन महिने काम केल्यानंतर पगारही मिळाला नाही. म्हणून सर्व तरुणांनी घरच्यांशी संपर्क साधून पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला व्यवस्थित नोकरी लागली नाही व जेथे नोकरी लागली तेथे पगारही दिला नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमचे घेतलेले पैसे परत द्या, अशी मागणी सिराजअलीकडे केली. परंतु तो पैसे परत करत नसल्यामुळे सोमवारी त्याच्या विरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानुसार सिराजअलीला पोलिसांनी अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर उभे केले.

Web Title: Belgaum News job in foreign fraud case