कॉंग्रेससमोर संख्याबळ वाढविण्याचे आव्हान 

मल्लिकार्जुन मुगळी 
बुधवार, 18 एप्रिल 2018

गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ सहा विधानसभा मतदारसंघात विजय मिळविलेल्या कॉंग्रेसला यावेळी जिल्ह्यातील जागा वाढविण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच पक्षाने सतीश जारकीहोळी व रमेश जारकीहोळी बंधुंना 12 आमदार निवडून आणण्याचे उद्दीष्ट दिले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ सहा विधानसभा मतदारसंघात विजय मिळविलेल्या कॉंग्रेसला यावेळी जिल्ह्यातील जागा वाढविण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच पक्षाने सतीश जारकीहोळी व रमेश जारकीहोळी बंधुंना 12 आमदार निवडून आणण्याचे उद्दीष्ट दिले आहे. पण, कित्तूर मतदारसंघात पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. खानापूर व सौंदत्ती मतदारसंघातही उमेदवारीवरुन नाराजी आहे. त्यामुळे, नाराजांना सांभाळून घेऊन विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील संख्याबळ वाढविण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. 

गेली दोन वर्षे सतीश व रमेश जारकीहोळी यांच्यात विळ्याभोपळ्याचे सख्य होते. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही भावडांमध्ये सख्य झाल्याचे कॉंग्रेसकडून सांगितले जात आहे. पण, प्रत्यक्ष निवडणूक काळात त्यांच्यात कितपत सामंजस्य असणार यावर पक्षाचे संख्याबळ ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. त्यात बेळगाव उत्तर, रामदुर्ग, यमकनमर्डी, कित्तूर, गोकाक व चिक्‍कोडी-सदलगा मतदारसंघांचा समावेश होता. भाजपला आठ जागा मिळाल्या होत्या, वायएसआर कॉंग्रेस व कजपला प्रत्येकी एक तर महाराष्ट्र एकीकरण समितीला दोन जागा मिळाल्या होत्या. बी. एस. आर. कॉंग्रेस व कजपच्या दोन्ही आमदारांनी वर्षभरानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे जिल्ह्यातील संख्याबळ दहा झाले होते. 

गेली पाच वर्षे कॉंग्रेसने राज्यात स्थिर सरकार दिले आहे. शिवाय जिल्ह्यातील कॉंग्रेस आमदारांनी निधी आणण्यात यश मिळविले आहे. पण, जिल्ह्यातील अठरा पैकी बारा जागा जिंकायच्या असतील तर नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागणार आहेत. कॉंग्रेसने जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण, काही मतदारसंघात उमेदवारीवरून नाराजी आहेत. भाजपतही नाराजी आहे. पण, त्या नाराजांची मते कॉंग्रेसकडे वळविण्यात पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना यश मिळणार का, हा प्रश्‍न आहे. 

गेल्या पाच वर्षात बेळगाव शहर व जिल्ह्यात कॉंग्रेस सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. याशिवाय लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. त्यामुळे, बेळगाव जिल्ह्यातील लिंगायत मतदार यावेळी कॉंग्रेससोबत जाण्याची शक्‍यता आहे. भाजपने बेळगाव दक्षिण व उत्तर तसेच खानापूरचे उमेदवार जाहीर करण्यास विलंब केला आहे. कॉंग्रेसने नेमके याच मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. गतवेळी बेळगाव ग्रामीण, खानापूर मतदारसंघात कॉंग्रेसला बंडखोरीचा फटका बसला होता. यावेळी बंडखोरी टाळण्यासाठीही नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. एकंदर या निवडणुकीत जारकीहोळी बंधूंचा कस लागणार हे नक्की आहे. 

Web Title: Belgaum News Karanataka assembly Election