अशोक पट्टण हॅट्‌ट्रिक साधणार का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

हत्तरगी - रामदुर्ग हा बेळगाव जिल्ह्यातील मागासलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर आतापर्यंत १३ वेळा झालेल्या निवडणुकीत ९ वेळा काँग्रेस, एकदा अपक्ष, दोनवेळा जनता पक्ष व एकदा भाजपला विजय मिळाला आहे.

हत्तरगी - रामदुर्ग हा बेळगाव जिल्ह्यातील मागासलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर आतापर्यंत १३ वेळा झालेल्या निवडणुकीत ९ वेळा काँग्रेस, एकदा अपक्ष, दोनवेळा जनता पक्ष व एकदा भाजपला विजय मिळाला आहे. काँग्रेसचे विधानसभेतील मुख्य प्रतोद अशोक पट्टण २००८ व २०१३ मध्ये येथून निवडून आले. या वेळीही पक्षाने त्यांच्यावरच विश्‍वास टाकला आहे. 

मतदारसंघावर पट्टण कुटुंबाचेच वर्चस्व राहिले आहे. १९५७ मध्ये महादेव पट्टण अपक्ष म्हणून निवडून आले. १९७८ मध्ये त्यांची पत्नी शारदव्वा पट्टण (काँग्रेस) तर त्यांचे पुत्र अशोक पट्‌टण (काँग्रेस) २००८ व २०१३ मध्ये निवडून आले. वडील, आई, मुलगा अशा तिघांना या मतदारसंघात आमदार होण्याचा मान मिळाला आहे. तसेच तिघांनाही एकेकदा पराभव पत्करावा लागला आहे. २००४ मध्ये भाजपचे महादेव यादवाड काँग्रेसचे अशोक पट्टण यांना हरवून निवडून आले. 

मतदारसंघात दोन साखर कारखाने असून त्यापैकी एक बंद आहे. काही ठिकाणी पॉवरलूम सुरु आहेत. शेती या येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. पण, पाणीसमस्या मोठी आहे. उन्हाळ्यात तीन महिने मलप्रभा नदी कोरडी पडते. लोकांना पाणी समस्या भेडसावत असते. या शिवाय शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न, मूलभूत सुविधाची कमतरता रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

यावेळी अशोक पट्टण (काँग्रेस), महादेव यादव (भाजप), रमेश पंचगट्टीमठ (भाजप बंडखोर), एम. जावेद (धजद), यांच्यासह ११ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत काँग्रेस, भाजप, धजद व बंडखोर भाजप यांच्यात होणार आहे. 

Web Title: Belgaum News Karanataka Assembly Election