मराठी भागावर अधिकार का? - एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

बेळगाव - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावात येऊन आपल्याला मराठी येत नसल्याबद्दल माफी मागतात. पण, मराठी येत नसलेल्या मुख्यमंत्र्याला मराठी भागावर राज्य करण्याचा अधिकारच काय असा सवाल सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला.

बेळगाव - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावात येऊन आपल्याला मराठी येत नसल्याबद्दल माफी मागतात. पण, मराठी येत नसलेल्या मुख्यमंत्र्याला मराठी भागावर राज्य करण्याचा अधिकारच काय असा सवाल सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला.

ही लढाई आरपारची असून लोकेच्छा व्यक्त करण्यासाठी समितीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. आंबेवाडीतील माऊली मंदिरासमोर रविवारी (ता. २९) रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. उद्योजक शिवाजी अतिवाडकर अध्यक्षस्थानी होते.

ते म्हणाले, ‘सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. कानडी भाषेला आमचा कधीही विरोध नव्हता. पण मराठी मुलुख महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या ६२ वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सीमाभागात येऊन काँग्रेसच्या प्रचारासाठी मतयाचना करत आहेत.

मराठी लोकांसमोर जाताना माफ करा मला मराठी येत नाही, असे म्हणत आहेत. पण, त्यांनी माफी मागण्याऐवजी या मराठी मुलुखावर राज्य करण्याचा त्यांना अधिकार आहे का हे तपासून पाहावे. शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार मध्यवर्ती समितीचे अधिकृत उमेदवार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे व अरविंद पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करून न्यायालयाला लोकेच्छा दाखवून द्या.’ 

एन. डी. म्हणाले....

  •     म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करा
  •  सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी अनेकांचे बलिदान
  •  कानडी भाषेला आमचा कधीही विरोध नव्हता
  •      कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःला तपासून पाहावे
Web Title: Belgaum News Karanataka Assembly election