बेळगुंदी जि.प. काँग्रेसमध्ये बंडाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

बेळगाव - एकेकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगुंदीत (ता. बेळगाव) काँग्रेसने वर्चस्व निर्माण केले. गेल्या अनेक वर्षांपासून येथे काँग्रेसला पसंती आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच धजद पूर्ण ताकदीने उतरला आहे.

बेळगाव - एकेकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगुंदीत (ता. बेळगाव) काँग्रेसने वर्चस्व निर्माण केले. गेल्या अनेक वर्षांपासून येथे काँग्रेसला पसंती आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच धजद पूर्ण ताकदीने उतरला आहे.

बेळगुंदी जिल्हा पंचायत मतदारसंघात पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले काँग्रेस नेत्यांनी धजदशी हातमिळवणी केली आहे. लवकरच त्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यासमोर आव्हान ठाकले आहे. 

बेळगाव तालुक्‍यातील बहुतेक गावे मराठी भाषिक आहेत. याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळत होते. पण, गेल्या जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकांमध्ये म. ए. समितीचा पराभव केला. काँग्रेसमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप आहे.

नव्या कार्यकर्त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील नाराजी उफाळून आली आहे. याचा फायदा घेण्यासाठी भाजप आणि धजद पुढे सरसावले आहेत. माजी एपीएमसी अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून धजदची उमेदवारी  मिळवली आहे. 

बेळगुंदी येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि ज्येष्ठ नेत्यांची चार दिवसांपूर्वी बेळगुंदी येथे गुप्त बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला हात देऊन धजदला पाठिंबा देण्याचा निर्णय नाराज नेत्यांनी घेतला आहे. परिणामी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळण्यास सुरवात झाली असून याची जोरदार चर्चा मतदरासंघात सुरू आहे. 

‘यापूर्वी बेळगुंदीत नेहमीच समितीचा भगवा फडकत असे. मात्र, काँग्रेसने दाखविलेल्या अमिषाला मतदार बळी पडल्याने समितीचे मोठे नुकसान झाले. काँग्रेसला निवडून दिल्यांनतर मतदारसंघात किती बदल झाला, याचीही प्रचिती गेल्या अडीच वर्षात मतदारांना आली आहे. यंदा कोणाच्या बाजूने जायचे हे मतदार ओळखून आहेत. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी मराठी भाषिक एकत्रित येऊन लढणार आहेत.  
-किरण मोटणकर,
मतदार

Web Title: Belgaum News Karnataka assembly Election