बेळगाव जिल्ह्यात 17 पाटील रिंगणात

राजेंद्र हजारे
बुधवार, 2 मे 2018

अनेक मतदारसंघांत ‘पाटीलकी’ दिसत आहे. जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघांत १७ पाटलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते निवडणुकीत सत्ता गाजवितात का? याबाबत मतदारांमध्ये औत्सुक्‍य वाढले आहे. 

निपाणी - विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जातीवर आधारित मतदान होण्याची शक्‍यता असल्याने जास्त मतदार असलेल्या समाजातील उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. विविध जाती, धर्माचे उमेदवार रिंगणात असले तरी अनेक मतदारसंघांत ‘पाटीलकी’ दिसत आहे. जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघांत १७ पाटलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते निवडणुकीत सत्ता गाजवितात का? याबाबत मतदारांमध्ये औत्सुक्‍य वाढले आहे. 

निपाणी मतदारसंघात आतापर्यंत काकासाहेब पाटील यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाली असून तीनवेळा ते विजयी झाले आहेत. तर यंदा प्रथमच शरद पाटील - अपक्ष रिंगणात आहेत. बेळगावसह अन्य जिल्ह्यातही पाटील आडनावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. विजापूर जिल्ह्यात विविध मतदारसंघांत पाटील विरूद्ध पाटील रिंगणात आहेत.

बबलेश्‍वरमध्ये काँग्रेसचे पालकमंत्री एम. बी. पाटील व भाजपातून विजूगौडा पाटील, इंडीमध्ये काँग्रेस आमदार यशवंतरावगौडा पाटील, भाजपतर्फे दयासागर पाटील, धजदतर्फे बी. टी. पाटील व अपक्ष म्हणून रवीकांत पाटील रिंगणात आहेत. देवहिप्परगीतून भाजपाचे सोमनगौडा पाटील, काँग्रसचे बापूगौडा पाटील, धजदचे राजूगौडा पाटील, बसवाण बागेवाडीतून काँग्रेसतर्फे विद्यमान शिवानंद पाटील, धजदतर्फे अप्पूगौडा पाटील (मनगोळी) लढत आहेत. 

मुद्देबिहाळमध्ये भाजपातर्फे माजी आमदार ए. एस. पाटील (नडहळ्ळी) तर विजापूर शहर मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री बसवनगौडा पाटील भाजपातर्फे निवडणूक लढवत आहेत. आता या निवडणुकीत किती पाटील बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदार संघ    उमेदवाराचे नाव    पक्ष

 • निपाणी    काकासाहेब पाटील    काँग्रेस
 • निपाणी    शरद पाटील    अपक्ष
 • चिक्कोडी-सदलगा    दादा पाटील    अपक्ष
 • हुक्केरी    ए. बी. पाटील     काँग्रेस
 • हुक्केरी    मल्लिकार्जुन पाटील    धजद
 • कागवाड    श्रीमंत पाटील    काँग्रेस 
 • अथणी    ए. पाटील    अपक्ष 
 • गोकाक    सुरेश पाटील    अपक्ष
 • कित्तूर    बाबासाहेब पाटील    अपक्ष 
 • बैलहोंगल    विश्‍वनाथ पाटील    भाजपा 
 • सौंदत्ती    दोड्डगौडा पाटील    धजद 
 • बेळगाव दक्षिण    अभय पाटील    भाजपा 
 • बेळगाव उत्तर    संभाजी पाटील    म. ए. समिती 
 • बेळगाव ग्रामीण    संजय पाटील    भाजपा
 • बेळगाव ग्रामीण    शिवनगौडा पाटील    धजद 
 • खानापूर    अरविंद पाटील    म. ए. समिती 
 • खानापूर    कृष्णाजी पाटील    अपक्ष
   
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election