अशोक चव्हाण, नितीन गडकरींचा बेळगावात समितीविरोधी प्रचार 

विनायक जाधव 
गुरुवार, 3 मे 2018

बेळगाव - एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यासारखे पक्ष सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठींबा देत समितीविरोधात उमेदवार थांबणार नसल्याचा निर्णय घेत असताना कॉंग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षातील महाराष्ट्राचे नेते समितीविरोधात प्रचारासाठी बेळगावात येत आहेत.

बेळगाव - एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यासारखे पक्ष सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठींबा देत समितीविरोधात उमेदवार थांबणार नसल्याचा निर्णय घेत असताना कॉंग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षातील महाराष्ट्राचे नेते समितीविरोधात प्रचारासाठी बेळगावात येत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्‍त होत असून आधी सीमावाद सोडवा नंतर प्रचाराला या अशी साद घालण्यात येत आहे. 

सीमाभागातील जनता मराठी अस्मिता आणि संस्कृती जपत महाराष्ट्रात जाण्यासाठी अव्याहतपणे संघर्ष करत आहे. निवडणुका या सुध्दा लोकेच्छा दाखविण्यासाठी चळवळीचाच भाग आहे. अशा वेळी सीमाभागातील जनता प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती म. ए. समिती निवडणुका लढवत आहे. पण, समितीच्याच उमेदवारांविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासारखे प्रभावी नेते बेळगावात येऊन मराठी लोकांकडे पक्षासाठी मतयाचना करत आहेत. त्यामुळे मराठी जनता सीमावाद सोडविण्यासाठी नेमकी कोणाकडे पाहावे, असा सवाल करत आहे. 

शुक्रवारी (ता. 4) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बेळगावात येणार असून दुपारी बारा वाजता बेळगाव दक्षिण मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची सभा घेणार आहेत. सायंकाळी चार वाजता बेळगाव ग्रामीण आणि खानापूर येथे कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधी खानापुरात सभा घेतली आहे. गुरुवारी (ता. 3) ते बेळगाव ग्रामीण मतदार संघात संध्याकाळी साडेसहा वाजता भाजपच्या उमेदवारासाठी सभा घेणार आहे. राष्ट्रीय पक्षांच्या या दुटप्पी धोरणाबाबत सीमाभागात संताप व्यक्‍त होत आहे. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election