बुद्धिभेद हाणून पाडा; समितीला विजयी करा - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

येळ्ळूर - सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात निवाड्यासाठी येथील मराठी माणसाने एकत्र येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीला विजयी करावे. सरकार मराठी मतदारांना फोडण्याचे काम करीत आहे. बुद्धिभेदाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे, मराठी मतदारांनी द्विधा मनःस्थितीतून बाहेर येऊन बहुमताने प्रकाश मरगाळे यांना विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांच्या प्रचारार्थ येळ्ळूरमधील लक्ष्मी चौकात सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, प्रा. मधुकर पाटील, मालोजी अष्टेकर, दीपक दळवी, राम आपटे, प्रकाश शिरोळकर, सचिन गोरले, राजाभाऊ पाटील, दिनेश ओऊळकर, ग्रामपंचायत अध्यक्षा अनसूया परीट, सुभाष ओळकर, प्रा. आनंद मेणसे, अर्जुन गोरल, एल. आय. पाटील आदी व्यासपीठावर होते.
ते म्हणाले, की मरगाळे हे सीमाप्रश्‍नासाठी तन-मन अर्पून काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. 

मराठी भाषिकांनी आता मानपान व व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून समितीला मतदान करावे. केंद्रातील मोदी सरकार केवळ आश्‍वासन देणारे आहे. अशा आश्‍वासने देणाऱ्या सरकारवर विश्‍वास ठेवू नका. कर्नाटकने जे त्रास दिले आहेत, त्या रागाचे परिवर्तन समितीच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहून मतदान करा. न्यायालयाच्या निर्णयासाठी प्रकाश मरगाळे विजयी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी प्रा. मधुकर पाटील, दीपक दळवी, राम आपटे, एल. आय. पाटील, उमदेवार प्रकाश मरगाळे यांनीही मतदान करण्याचे आवाहन केले. सभेला समितीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

कर्नाटकातील झुंडशाहीविरोधात काम करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवरायांचा आवाज कर्नाटक विधानसभेत उठविण्यासाठी प्रकाश मरगाळे यांना मतदान करा. फोडा आणि झोडा अशी नीती राबविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. स्वाभिमानाने मराठीसाठी मतदान करा.
- आमदार प्रकाश आबिटकर

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election