सिद्धरामय्यांकडून चक्‍क मोदींची स्तुती!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मंड्या - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. त्यामुळे काही काळ काँग्रेस कार्यकर्ते अक्षरशः स्तब्ध झाले; पण नंतर सिद्धरामय्या यांना आपली चूक उमगल्याने तातडीने त्यांनी चूक सुधारली.

निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा राज्यभरात होत आहेत. त्यामुळे सध्या कर्नाटकातील वातावरण मोदीमय झाले आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा राज्यात सत्ता मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या सिद्धरामय्या यांना जळी, स्थळी, काष्ठी मोदी दिसू लागले आहेत. मंगळवारी (ता. ८) मंड्या जिल्ह्यातील मालवळ्ळी येथील जाहीर सभेत भाषण करताना सिद्धरामय्या यांची जीभ घसरली.

सिद्धरामय्या हे काँग्रेसचे उमेदवार पी. एम. नरेंद्र स्वामी यांच्या प्रचारार्थ भाषण करत होते. नरेंद्र स्वामी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देताना सिद्धरामय्या म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी मतदारसंघात खूप विकासकामे केली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना मत म्हणजे मला मत दिल्यासारखे आहे. सिद्धरामय्या यांच्या तोंडून मोदी यांचे कौतुक ऐकून उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते गोंधळले; पण सिद्धरामय्या यांना लगेचच आपली चूक समजली व त्यांनी नरेंद्र मोदी नव्हे, तर नरेंद्र स्वामी असे सांगून चूक सुधारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election