बेळगावात भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

संजय सूर्यवंशी
शुक्रवार, 11 मे 2018

बेळगाव  - शहापूर परिसरातील गणेशपूर गल्ली येथे आज सायंकाळी पाचच्या सुमारास भाजप व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. जाहीर प्रचार संपला असताना मतदारांना घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांकडून बॅलेट पेपरचे वाटप सुरू असताना काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले व त्यांच्यामध्ये धुमश्चक्री उडाली.

गुरुवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपल्यानंतर आज दिवसभर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना घरोघरी भेटी देऊन आपल्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करीत होते. गणेशपुर गल्ली येथे भाजपचे कार्यकर्ते थांबलेले असताना याच वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्या ठिकाणी जाऊन आपल्या उमेदवारांचे पत्रक देऊन मतदानासाठी आवाहन केले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पैशाचे वाटप करत असल्याचा जाब विचारत भांडण काढले.

हे भांडण  हाणामारीपर्यंत येऊन एका काँग्रेस कार्यकर्त्यांचा शर्ट फाडला व त्याला मारहाण केली. यामध्ये  कार्यकर्ता जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर भाजप व कॉंग्रेस अशा दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. त्याच्यावर उपचारानंतर या घटनेची तपशीलवार माहिती घेऊन नोंद करण्यात येईल, असे शहापूरचे पोलीस निरीक्षक एन. मृत्युंजय यांनी सांगितले.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election