निपाणीत विकासकामे, घरोघरी प्रचारच यशस्वी 

अमोल नागराळे
मंगळवार, 15 मे 2018

काैल मतदारांचा वार्तापत्र - निपाणी मतदार संघ 

पाच वर्षात मतदारसंघात केलेली विकासकामे तसेच जाहीर प्रचारावर भर न देता घरोघरी पोचण्याचा आमदार जोल्ले यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे निकालावरुन दिसून येते. 

निपाणी - 2013 च्या निवडणुकीत निपाणी विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार ठरलेल्या भाजपच्या उमेदवार आमदार शशिकला जोल्ले यांनी आता निपाणी तालुक्‍याच्याही पहिल्या आमदार होण्याचा मान मिळविला आहे. पाच वर्षात मतदारसंघात केलेली विकासकामे तसेच जाहीर प्रचारावर भर न देता घरोघरी पोचण्याचा आमदार जोल्ले यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे निकालावरुन दिसून येते. 

सलग दुसऱ्यांदा विजयी होऊन आपला गड राखताना जोल्ले यांचे 2013 च्या तुलनेत मताधिक्‍य जवळपास 10 हजारांनी घटले, तरी केवळ पराभवासाठी एकत्रित आलेल्या कॉंग्रेसच्या मातब्बरांविरोधात सौ. जोल्ले यांनी दिलेली झुंज कॉंग्रेसला विचार करायला लावणारी आहे. 

गतवेळी अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार जोल्ले यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी मात्र प्रा. जोशी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना पाठींबा दिला. अण्णासाहेब जोल्ले चिक्कोडी-सदलगा मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरल्याने निपाणीतील प्रचार यंत्रणेची जबाबदारी आमदार जोल्लेंवर ठेपली. 

आमदार झाल्यापासून जोल्ले यांनी पाच वर्षात नियोजनबध्द काम करण्यावर भर दिला होता. मागील वर्षभरात आमदार जोल्ले यांनी मतदार संघात विकासकामांसह विविध कार्यक्रमांचा धडाका लावला. योग्य नियोजन, व्यवस्थापन व दर्जा अशा काम करण्याच्या पध्दतीमुळे देखील अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. 

प्रा. सुभाष जोशी यांनी कॉंग्रेसला दिलेला पाठींबा व कॉंग्रेसकडून आमदार जोल्ले यांच्यावर वारंवार होणारे आरोप यात जोल्ले एकाकी पडल्या. पण कितीही आरोप झाले तरी एकाही आरोपाला किंवा टीकेला उत्तर देण्यात शक्ती खर्च न करता अखेरपर्यंत काम करण्याला आमदार जोल्ले यांनी प्राधान्य दिले. या कृतीनेच आमदार जोल्ले यांना तारले असल्याची चर्चा आहे. 

  • कॉंग्रेस नेत्यांची एकी मतपरिवर्तनात अपयशी 
  • शशीकला जोल्लेंचा एकहाती प्रचार प्रभावी 
  • प्रचारातली चुरस मतांमध्ये दिसलीच नाही 
  • भपकेबाजीपेक्षा नियोजनबद्ध प्रचारच तरला 
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election