भालचंद्र जारकीहोळीच अरभावीचे "दादा' 

वसंत हवालदार
मंगळवार, 15 मे 2018

* कौल विधानसभेचा - वार्तापत्र.....मतदारसंघ : अरभावी 

गोकाक तालुक्‍यातील घटप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पंचवीस वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केलेले माजी मंत्री आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी चौथ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपणच दादा असल्याचे सिद्ध केले आहे.

गोकाक तालुक्‍यातील घटप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पंचवीस वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केलेले माजी मंत्री आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी चौथ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपणच दादा असल्याचे सिद्ध केले आहे. राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभापासून ते समाजकार्यात सक्रिय होते. तळागाळापर्यंत त्यांचा संपर्क होता. त्यामुळे, त्यांना निवडणूक जिंकणे सोपे गेले. 

अर्ज भरला त्याच दिवसापासून आमदार जारकीहोळींना विजयाची खात्री होती. ते किती मताधिक्‍याने निवडून येणार याचीच उत्सुकता होती. मताधिक्‍याबाबत मोठ्या प्रमाणात पैजा लावण्यात येत होत्या. 2003 च्या निवडणुकीत त्यांनी धजदच्या उमेदवारीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. कौजलगी यांचा पराभव करून थेट मंत्रिमंडळात स्थान मिळवले. 2008 मध्येही ते धजदच्या तिकिटावर निवडून आले. 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन कॉंग्रेसचे विवेक पाटील यांचा पराभव केला. पण, त्यावेळी कॉंग्रेस सत्तेवर आल्याने त्यांचा पाच वर्षे विरोधी बाकावर बसायला लागले. पण, त्यांनी विकासकामे व कल्याणकारी योजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्याचाच लाभ त्यांना यावेळी झाला. 

यंदाच्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसचे अरविंद दळवाई व धजदचे भीमाप्पा गडाद यांनी आव्हान दिले होते. त्यांची दळवाईंशी लढत होईल, असे वाटले होते. परंतु, गडाद यांनी अनपेक्षितरित्या दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. कॉंग्रेसला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. जारकीहोळी यांनी 48 हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला. सर्व मतदारसंघात "अँटी इन्कम्बन्सी'चे वारे वाहत असताना त्यांनी मिळवलेला विजय महत्त्वाचा आहे. चार टर्ममध्ये केलेल्या विकासकामांचाच हा विजय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

एक नजर 

  • भालचंद्र जारकीहोळींचा चौथा विजय 
  • मतदारसंघात पाच वर्षात सतत सक्रीय 
  • 48 हजारहून अधिक मतांनी विजय 
  • धजदला दुसरे तर कॉंग्रेस फेकले तिसऱ्या स्थानी 
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election