स्वतःच्या ताकदीवर पी. राजीव विजयी 

एम. ए. रोहिले 
मंगळवार, 15 मे 2018

कुडची मतदार संघ 

कुडची विधानसभा मतदार संघात एकूण 19 जण रिंगणात होते. पण खरी लढत कॉंग्रेसचे उमेदवार अमित घाटगे व भाजपच्या पी. राजीव यांच्यात झाली. यामध्ये पी. राजीव यांनी स्वतःच्या ताकदीवर विजय मिळविला. 

बेळगाव - कुडची विधानसभा मतदार संघात एकूण 19 जण रिंगणात होते. पण खरी लढत कॉंग्रेसचे उमेदवार अमित घाटगे व भाजपच्या पी. राजीव यांच्यात झाली. यामध्ये पी. राजीव यांनी स्वतःच्या ताकदीवर विजय मिळविला. 

कुडची विधानसभा मतदार संघ 2008 साली निर्माण झाला असून कॉंग्रेस व बीएसआरने आपले उमेदवार प्रत्येकी एकदा निवडणूक आणण्यात यश मिळविले आहे. यंदाच्या तिसऱ्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस यांच्यात लढत झाली. गतवेळी बीएसआरमधून विजयी झालेले आमदार पी. राजीव भाजपमधून रिंगणात उतरले. कुडची मतदारसंघावर कुणाचे वर्चस्व राहणार? यावरून जोरात चर्चा रंगू लागल्या होत्या. 

मूळ भाजपवाल्यांचा विरोध असतानाही पी. राजीव यांना प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. पी. राजीव यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर "वन मॅन आर्मी"च्या धर्तीवर नियोजनबद्ध प्रचाराने विजय मिळविला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शाम घाटगे यांनी आपले चिरंजीव अमित घाटगे यांना राजकारणात आणून कुडची मतदार संघातून नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. अमित घाटगे हे कॉंग्रेसचे युवा उमेदवार होते. ते प्रचारात काहींशे कमी पडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. तसेच काही कॉंग्रेस नेत्यांनी केलेली बंडखोरीही त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली असल्याची जोरदार चर्चा मतदार संघात रंगली आहे. 

पी राजीव यांनी 2013 सालच्या निवडणुकीत 46 हजार मताधिक्‍य मिळविले होते. आता ते 12 हजारावर आले आहे. त्यामुळे मताधिक्‍य घटले असले तरी भाजपचा विजय हा पी. राजीव यांच्या स्वतःच्या ताकदीवर झाला आहे, ही त्यातील विशेष बाब आहे. कॉंग्रेसला या मतदार संघात विजयाची संधी होती. पण पी. राजीव यांच्यासारखा मातब्बर प्रतिस्पर्धी रिंगणात उतरल्याने हार पत्करावी लागली असल्याची चर्चा आहे. 

 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election