बेळगाव दक्षिणमध्ये भाजपची लाट 

मिलिंद देसाई 
मंगळवार, 15 मे 2018

कौल विधानसभेचा मतदारसंघ : बेळगाव दक्षिण 

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बेळगाव दक्षिण मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ उगवले आहे. या मतदारसंघात माजी आमदार अभय पाटील यांनी बाजी मारली.

बेळगाव - महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बेळगाव दक्षिण मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ उगवले आहे. या मतदारसंघात माजी आमदार अभय पाटील यांनी बाजी मारली. महाराष्ट्र एकीकरण समितीत झालेली बंडखोरी व कॉंग्रेसने दिलेला बाहेरचा उमेदवार ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. पण, श्री. पाटील यांना मिळालेले मताधिक्‍य आश्‍चर्यकारक आहे. यावरून त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचीही मते मिळविल्याचे दिसून येते. 

निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु, काही नेत्यांच्या हेकेखोरीमुळे शेवटच्या क्षणापर्यंत एकी होऊ शकली नाही. त्याचा परिणाम मराठी मतदारांच्या मनोधैर्यावर झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते. दुसरा मुद्दा असा की पाच वर्षांत दक्षिण मतदारसंघाचा झालेला विकास. बेळगाव उत्तरच्या तुलनेत दक्षिणमध्ये कमी विकासकामे झाली. त्यामागे कारणे वेगवेगळी असली, तरी मतदारांचा रोष नगरसेवकांवर होता. त्याचेही प्रतिबिंब निकालातून उमटले आहे. 

दक्षिणमध्ये माजी आमदार पाटील व समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांच्यात थेट लढत होईल, असा अंदाज व्यक्‍त केला जात होता. किरण सायनाक यांनी समितीतून बंडखोरी केली असली, तरी मराठी मतदार श्री. मरगाळेंना साथ देतील, अशी अपेक्षा होती. तसेच, कॉंग्रेसला या वेळी स्थानिक उमेदवार देता आला नाही. विधान परिषदेचे सदस्य ए. डी. लक्ष्मीनारायण यांना उमेदवारी देण्यात आली. ते या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या विणकर समाजाची मते घेतील, अशी अटकळ होती. पण, तसे झाले नाही. 

महाराष्ट्र एकीकरण समितीमधील बंडाळी, तसेच कॉंग्रेस उमेदवाराला मिळालेली कमी मते यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. मतदारसंघात भाजपचे वारे अजिबात नव्हते. तरीही पक्षाने मिळविलेला मोठा विजय महत्त्वाचा आहे. तसेच, समिती उमेदवारापेक्षा बाहेरून आलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली अधिक मतेही विचार करायला लावणारी आहेत. 

एक नजर 

  • भाजपला पहिल्यांदाच मोठे मताधिक्‍य 
  • कोणतीही लाट नसताना विजय 
  • समितीला बेकीचा फटका 
  • कॉंग्रेस उमेदवाराची मते विचार करायला लावणारी 
     
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election