स्वप्ने एका घरात अनेक आमदारांची

रवींद्र मंगावे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जिल्ह्यात घराणेशाहीच्या राजकारणात आतापर्यंत जारकीहोळी बंधूच वरचढ ठरले आहेत. त्यांचा अपवाद सोडला तर अन्य कोणाला राजकारणात घराणेशाही प्रभावीपणे राबवता आलेली नव्हती. उमेश कत्ती व प्रकाश हुक्केरी यांनी तसा प्रयत्न केला, पण एक खासदार व एक आमदार एवढ्यापुरते मर्यादित राहिले. आता जिल्ह्यातील काही नेत्यांना घरात दोन आमदार करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. जिल्हा पंचायतीपासून अनेक प्रतिष्ठीत पदे आमदारांनी आपल्या घरात आजपर्यंत ठेवली आहेत. त्यातून राजकीय कुवत असलेले अनेक कार्यकर्ते अद्याप दुसऱ्या फळीतच चाचपडत आहेत.

खासदार प्रकाश हुक्केरी ६ वेळा आमदार व दोन वेळा राज्यात मंत्री झाल्याने त्यांचा जीव कधी दिल्लीत रमलाच नाही. त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा आहे. त्यांचा गड असलेल्या चिक्कोडी-सदलगा मतदारसंघात त्यांनी आपला मुलगा गणेश याला बस्तान बसवून दिले आहे. त्यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे. आतापर्यंत दुसऱ्या मतदारसंघात उघडपणे त्यांनी दावेदारी सांगितली नसली तरी मुरब्बी राजकारणी असलेल्या श्री. हुक्केरी यांनी वरिष्ठ पातळीवरून निपाणी व कागवाड मतदारसंघावर डोळा ठेवला आहे.

कागवाडमध्ये धजदमधून काँग्रेसमध्ये गेलेले श्रीमंत पाटील प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर निपाणीतून माजी आमदार काकासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळण्याचीच शक्‍यता अधिक आहे. मग, प्रकाश हुक्केरींचे घरात दोन आमदारांचे स्वप्न कसे सत्यात उतरणार हे पाहावे लागेल.
आमदार उमेश कत्ती हेही जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत.

हुक्केरीतून त्यांनी वेगवेगळ्या पक्षांतून सात वेळा विजय मिळवला आहे. एकदा त्यांनी भाऊ रमेश कत्ती यांना खासदारही केले आहे. रमेश कत्ती यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत थोड्या मताने पराभव झाला आहे. उमेश कत्ती यांची हुक्केरीतून भाजपच्या यादीत उमेदवारी अंतिम झाली असली तरी भाऊ रमेश किवा मुलगा निखिल यांना बेळगाव उत्तरमधून रिंगणात उतरण्याची तयारी चालवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
केवळ पाच वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव टाकलेल्या जोल्ले दाम्पत्यांनाही एका घरात दोन आमदारांची स्वप्ने पडल्यास नवल वाटायला नको.

सध्या निपाणीतून शशीकला जोल्ले आमदार आहेत. तर चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातून श्री. हुक्केरींचा गड भेदण्यासाठी अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच जोर केला आहे. चिक्कोडी-सदलगा व निपाणी मतदारसंघातून जोल्ले व हुक्केरी कुटुंबात लढत लावण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

जिल्ह्यात कुठल्याही पक्षाचे वादळ आले तरी गोकाक तालुक्‍यातून जारकीहोळी बंधूंचा करिष्मा काही कमी झालेला नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी तेथे एक मंत्रिपद कायम आहे. चार भाऊबंद असले तरी त्यांच्यात राजकीय वैरही आहे. रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी हे काँग्रेसमधून तर भालचंद्र जारकीहोळी भाजपातून आमदार आहेत. आता येथे लखन जारकीहोळी यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करण्यासाठी त्यांचे बंधू कामाला लागले आहेत. त्यांचा मतदारसंघ अद्याप निश्‍चित झालेला 
नाही एवढेच.

सर्व पक्षीय नेत्यांमध्ये जिल्ह्यतील प्रभावी राजकारणी म्हणून खासदार डॉ. प्रभाकर कोरे कर्नाटकात परिचीत आहेत. त्यांचा मुलगा अमित कोरे यांनी दोन साखर कारखाने चांगल्याप्रकारे सांभाळत एक बिझनेसमन म्हणून ख्याती मिळवली आहे. श्री. कोरे राज्यसभेत असल्याने त्यांना आपल्या मुलाला जनतेतून एकदा लोकप्रतिनिधी करण्याची इच्छा असू शकते. एकदाही तशी टेस्ट त्यांनी घेतलेली नसली तरी आगामी दिवसांत हा प्रयोग नक्की होणार असल्याचे संकेत आहेत. आता प्रतीक्षा ही आहे की ते आपला मुलगा अमित यांना विधानसभेसाठी एखादा मतदारसंघ ठेवतात की लोकसभेला उतरवतात, हे पाहावे लागेल. 

या दिग्गज नेत्यांच्या स्वप्नांना त्यांचे हायकमांड कसे साथ देतात व दिल्यास मतदार कशाप्रकारे स्वीकार करतात, याचीच प्रतीक्षा आहे.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election special