कॅसलरॉकजवळ रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

कॅसरलॉक ते करंजोळ लोहमार्गावर गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास एक बिबट्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला.

रामनगर - कॅसलरॉक ते दूधसागर लोहमार्गावर वाघ व बिबट्यांचा वावर असून पर्यटकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन काही दिवसांपूर्वी रेल्वे खात्याने केले होते. त्यात तथ्य असल्याचे गुरुवारी (ता. 28) स्पष्ट झाले.

कॅसरलॉक ते करंजोळ लोहमार्गावर गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास एक बिबट्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रेल्वेचे गॅंगमन नेहमीप्रमाणे या मार्गावर पाहणी करत होते. पहाटे कॅसलरॉक ते करंजोळदरम्यान पाहणी करत असताना एक बिबट्या लोहमार्गाजवळ मृतावस्थेत पडल्याचे नाईक नावाच्या गॅंगमनला आढळले. त्याने घटनेची माहिती कॅसलरॉक वन परिक्षेत्र कार्यालयाला दिली. मात्र, करंजोळ स्टेशन व परिसर गोवा हद्दीत येत असल्याने अखेर कोलम वन कार्यालयाला कळविण्यात आले. त्यानंतर वनक्षेत्रपाल वासुदेव गवस सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता रेल्वेच्या धडकेत बिबट्याचे तोंड फुटल्याचे आढळून आले.

पंचनामा करुन बिबट्याचे कलेवर आधी करंजोळ स्टेशनला नेण्यात आले. त्यानंतर मालगाडीने ते कोलमला हलविण्यात आले. तिथे उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा वनाधिकाऱ्यांना सोपविण्यात येणार आहे.

दूधसागर धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक घनदाट जंगलातून गेलेल्या लोहमार्गाच्या बाजूने चालत जातात. काही दिवसांपूर्वी करंजोळ परिसरात स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तशी माहिती वनखात्यालाही दिली होती. तर काही दिवसांपूर्वी रेल्वे खात्यानेही पर्यटकांना धोक्‍याचा इशारा दिला होता. कॅसलरॉक ते दूधसागरपर्यंतच्या लोहमार्गावर वाघ व बिबट्याचा वावर असून पर्यटकांनी येथून जाताना खबरदारी घ्यावी, असे जाहीर आवाहन करण्यात आले होते. बिबट्याच्या मृत्युमुळे त्यात तथ्य असल्याचे आढळले आहे.

Web Title: Belgaum News Leopard Death near KasalRock