महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी वकिलांची बैठक नोव्हेंबरमध्ये

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी वकिलांची बैठक नोव्हेंबरमध्ये

बेळगाव -  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी १० ऑक्‍टोबर रोजी होणारी सुनावणी तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडली. लवकरच पुढील सुनावणीची तारीख जाहीर होणार आहे. त्याआधी पुढील रणनीती ठरविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या वकील पथकाची महत्त्वाची बैठक ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्‍यता आहे.

सीमाप्रश्‍न निर्णायक वळणावर आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्राच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला या न्यायालयीन लढ्यासाठी सातत्याने सतर्क राहून राजकारणी, अधिकारी आणि वकील यांच्या संपर्कात राहावे लागत आहे. सातत्याने त्यांच्या मागे लागून लढ्याला बळकटी द्यावी लागत आहे. एकीकडे न्यायालयीन लढ्याकडे लक्ष पुरवत असताना रस्त्यावरील लढ्याकडेही तितक्‍याच जोरकसपणे टिकाव धरावा लागत आहे. त्यामुळे ही दुहेरी कसरत करावी लागत आहे.

नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन मोठे कार्यक्रम आहेत. त्यामध्ये १ नोव्हेंबर काळा दिन आणि दुसरा म्हणजे कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाला कडाडून विरोध करण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन. या दोन्ही कार्यक्रमांसाठी समिती नेत्यांना प्रशासनाची परवानगी, लोकांत जनजागृती या दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. गेल्या ६१ वर्षांपासून दरवर्षी १ नोव्हेंबरला काळा दिन सातत्याने आचरण्यात येतो. पण, काही वर्षांपासून काळ्यादिनाची निषेध फेरी निघू नये, यासाठी

जिल्हा, पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. त्यात कानडी संघटनांना खतपाणी घालण्यात येत आहे. कितीही विरोध झाला तरी, मराठी जनता आपली अस्मिता प्रकट करण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे. त्यामुळे यंदाही या फेरीचे आयोजन, सभेसाठी महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण देण्यात येणार आहे.
यंदा आठव्यांदा बेळगावात विधिमंडळ अधिवेशन होणार आहे. १३ नोव्हेंबरपासून त्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी विधानसभेच्या सभापतींनीही पाहणी केली आहे. २००६ मध्ये जेव्हा पहिले अधिवेशन बेळगावात भरले, त्यावेळीही म. ए. समितीने महामेळावा घेऊन कर्नाटकाविरोधात एल्गार पुकारला होता.

ज्या-ज्यावेळी बेळगावात अधिवेशन होईल, त्या प्रत्येकवेळी मराठी जनतेचा विरोध म्हणून महामेळावा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार हा महामेळावा होत असतो. काही वेळा महामेळाव्याला परवानगी नाकारली. पण, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी रस्त्यावर उतरून कर्नाटकाचा निषेध केला. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली. तरीही कर्नाटकाच्या विधिमंडळाला विरोध करण्यात आला. यंदाही महामेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महामेळाव्याची परवानगी, जगजागृतीचे आव्हान समितीसमोर असणार आहे.

या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांबरोबरच न्यायालयीन कामासाठी आता सीमाप्रश्‍नी कामकाज पाहणाऱ्या वकिलांचीही महत्त्वाची बैठक होणार आहे. ९ ते १४ नोव्हेंबरपर्यंतही चर्चा चालणार असल्यामुळे त्याठिकाणीही उपस्थित राहून पुढील रणिनीती आखणे आणि दाव्याला बळकटी देण्याचे काम करावे लागणार आहे. एकंदर आतापासूनच समितीसाठी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटीलांसाठी आग्रह
१ नोव्हेंबर काळा दिन आणि महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामध्ये काळ्या दिनाला महाराष्ट्राचे महसूल आणि सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहावे, अशी काही नेत्यांची अपेक्षा आहे, तर महामेळाव्याला महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीसाठी समिती आग्रही असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com