काळा दिन कार्यक्रमात नीतेश राणेंचा सहभाग !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

बेळगाव -  भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित १ नोव्हेंबर काळ्यादिनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत.

बेळगाव -  भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित १ नोव्हेंबर काळ्यादिनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे समितीनेही रविवारपासून (ता. २२) गावोगावी जागृती मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे.

यंदा नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला दोन आंदोलने करावी लागणार आहेत. १ नोव्हेंबरचा काळादिन आणि कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात पुकारलेला १३ नोव्हेंबरचा महामेळावा यशस्वी करून कर्नाटक आणि केंद्र सरकारला मराठी अस्मिता दर्शवावी लागणार आहे. आठ दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठका घेऊन दोन्ही आंदोलनांची घोषणा केली आहे. त्यानुसार रविवारपासून जागृती कार्यक्रमालाही सुरवात झाली आहे.

काळ्यादिनी सहभागी होऊन सीमावासीयांना मार्गदर्शन करण्यासाठी आमदार नीतेश राणे यांना विनंती केली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी त्यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी त्यांनी काळ्यादिनी निघणाऱ्या सायकल फेरीत सहभागी होणार असल्याचे सांगितले. त्यांनी सीमाप्रश्‍नावर समिती नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. या लढ्यात आपला सहभाग सक्रिय असेल, असे त्यांनी सांगून मध्यवर्ती व शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, व्ही. व्ही. अनासकर यांना छावा पुस्तक भेटीदाखल दिले.

काळा दिन आणि महामेळाव्यासाठी रविवारपासून तालुका म. ए. समितीने गावोगावी जागृतीला सुरुवात केली. सांबऱ्यात जागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील आणि दत्ता उघाडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. सीमाप्रश्‍न निर्णायक वळणावर असल्यामुळे आपली अस्मिता जागृत ठेवणे आणि रस्त्यावर उतरून सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी काळा दिन आणि महामेळावा अभूतपूर्व होणे आवश्‍यक आहे. मराठीसाठी सर्वांनी एकत्र येऊन आपले मन आणि मनगट बळकट करावे.

सीमाप्रश्‍नाची सोडवणूक होईपर्यंत कर्नाटकशी दोन हात करण्यास तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी एपीएमसी सदस्य तानाजी पाटील, महेश जुवेकर, आर. आय. पाटील, शिवाजी जोगाणी उपस्थित होते.

सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा - प्रकाश शिरोळकर

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबरला काळ्यादिनी आयोजित मूक सायकल फेरीत शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून केंद्र आणि राज्य सरकारला मराठी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी शिवसैनिकांना केले. रामलिंग खिंड गल्लीतील शिवसेना कार्यालयात रविवारी (ता. २२) काळा दिन फेरीची पूर्वतयारी बैठक आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘गेल्या ६१ वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची आस घेऊन मराठी भाषिक जनता कर्नाटकाच्या जोखडात बांधली गेली आहे. कर्नाटकी सरकारचे अत्याचार वाढत आहेत. १ नोव्हेंबरला बेळगाव सीमाभाग कर्नाटकात डांबल्याचा निषेध म्हणून सीमाभागातील जनता यादिवशी काळा दिन पाळत आली आहे. यंदाही काळा दिन पाळला जाणार असून संभाजी उद्यानातून सकाळी नऊ वाजता मूक सायकल फेरीला सुरवात होणार आहे.

फेरीत सहभागी होण्यासाठी शिवसैनिकांनी सकाळी आठ वाजता रामलिंग खिंड गल्लीतील शिवसेना कार्यालयाजवळ एकत्र यावे. त्यानंतर संभाजी उद्यानाकडे कूच करुन फेरीत सहभागी व्हायचे आहे. अधिकाधिक शिवसैनिकांनी फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला चंदगडच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांता जाधव, बेळगाव शहरप्रमुख दिलीप बैलूरकर, उपप्रमुख प्रवीण तेजम, तालुकाप्रमुख सचिन गोरले, उपप्रमुख पिराजी शिंदे, गुणवंत पाटील, राजू तुडयेकर, बन्सी गुरव, राजू निलजकर, बाळासाहेब डंगरले, वैजनाथ भोगण, मनोहर तेजम, 
महेश गावडे, संतोष समर्थ, विनायक बेळगावकर आदी उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Nitesh Rane will attain Black Day program