‘आण्विक प्रशिक्षण केंद्र’ लवकरच बेळगावात

‘आण्विक प्रशिक्षण केंद्र’ लवकरच बेळगावात

बेळगाव - आण्विक कचऱ्यापासून होणारी दुर्घटना टाळण्याबाबतचे प्रशिक्षण देणारे अग्निशमन दलाचे राज्यातील पहिले ‘आण्विक प्रशिक्षण केंद्र’ लवकरच बेळगावात सुरु होत आहे. यासाठी कित्तूरजवळ जमीन संपादीत करण्यात आली असून वर्षभरात तेथे प्रशिक्षण तळ उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. एनडीआरएफच्या धर्तीवर हे प्रशिक्षण असणार आहे. शासनाने राज्यातील सात ठिकाणी अग्निशमन जवानांना विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

इमारत दुर्घटना, जंगलातील आग विझविणे, महापूर, रासायनिक गळती, गॅस गळती, आण्विक कचरा, रस्ते दुर्घटना, भूकंप, औद्योगिक दुर्घटना आदींचे प्रशिक्षण अग्निशमन दलाच्या जवानांना दिले जाते. मात्र, असे प्रशिक्षण देताना केवळ सामान्य माहिती आणि प्रशिक्षणाचा समावेश असतो. पण, आता नवीन सात केंद्रावर या सर्वांचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली असून बेळगावात निर्माण होणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात ‘आण्विक कचरा’ संबंधी प्रशिक्षण मिळणार आहे.

‘आण्विक कचरा’ संबंधी जवानांचे हे विशेष दल ठरणार आहे. बेळगावातूनच विशेष प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात होणार असून पहिले केंद्र कित्तूरजवळील अळणावरमध्ये होणार आहे. यासाठी ५६ एकर जमीन राखीव आहे. प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी १५० कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे. केंद्रासाठी आणखी जमीन याठिकाणी संपादीत केली जाणार आहे.

नियोजित केंद्र    मिळणारे विशेष प्रशिक्षण

  • बेळगाव.........आण्विक कचरा

  • बंगळूर..........इमारत दुर्घटना

  • मंगळूर..........गॅस पाईपलाईन, रासायनिक गळती

  • म्हैसूर............महापूर आणि अरण्यसंबंधी घटना

  • दावणगेरी........रस्ते दुर्घटना

  • गुलबर्गा...........भूकंप

  • बळ्ळारी...........औद्योगिक दुर्घटना

सध्या राज्यात बंगळूर आणि म्हैसूरमध्ये अग्निशमन दलाचे प्रशिक्षण केंद्र असून याठिकाणी सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जवानांना सेवेत रुजू करून घेतले जाते. वेगवेगळ्या प्रकरणांच्या नैसर्गिक आपत्तींसाठी वेगळे तंत्र वापरावे लागते. त्यासाठी प्रशिक्षणात बदल करण्याचा निर्णय घेतला असून एनडीआरएफ या केंद्र सरकारच्या दलाप्रमाणे राज्यात विशेष दल स्थापन केले जाणार आहे. या दलातील जवानांना दुर्घटनेचे विशेष प्रशिक्षण प्राप्त राहणार असून बेळगावातील केंद्रात केवळ आण्विक कचऱ्यासंबंधी प्रशिक्षणाचा समावेश असेल.

‘एनडीआरएफ’प्रमाणे रचना
राज्यात मागील काही वर्षात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती घडल्या आहेत. यात भूकंप, महापूर, जंगलाला आग लागणे, मोठ्या इमारती कोसळणे अशा घटनांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना सध्या दिले जाणारे प्रशिक्षण पारंपरिक पद्धतीचे आहे. जवानांना प्रत्येक घटना हाताळण्यासाठी एनडीआरएफप्रमाणे पथक तयार केल्यास केंद्राची मदत मिळण्याआधीच अशा दुर्घटनांवर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. तसेच दुर्घटनेतील अधिक नुकसानही वेळीच आटोक्‍यात आणले जाऊ शकते. यासाठी अशा प्रशिक्षण केंद्राची राज्याला सध्या गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com