कर्नाटकचे मंत्री पाटील यांच्या निषेधार्थ अंकलीत बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मांजरी - हुबळी येथे झालेल्या स्वतंत्र लिंगायत समाजाच्या मागणीच्या सभेत कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील यांनी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या व्यक्तिगत व चारित्र्याबाबत अपशब्द वापरले आहे. त्यामुळे खासदार कोरे यांच्या समर्थकांनी अंकलीत बुधवारी (ता. 8) सकाळी मंत्री एम. बी. पाटील यांच्या विरोधात मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

मांजरी, जि. बेळगाव - हुबळी येथे झालेल्या स्वतंत्र लिंगायत समाजाच्या मागणीच्या सभेत कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील यांनी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या व्यक्तिगत व चारित्र्याबाबत अपशब्द वापरले आहे. त्यामुळे खासदार कोरे यांच्या समर्थकांनी अंकलीत बुधवारी (ता. 8) सकाळी मंत्री एम. बी. पाटील यांच्या विरोधात मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

तसेच गावातील सर्व व्यवहार बंद करून काही काळ चिक्कोडी-सांगली रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. मंत्री पाटील यांनी माफी मागावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना दिले. 

हुबळीच्या सभेत मंत्री पाटील यांनी, खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई सोसायटीच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन लिंगायत समाज मागणीला पाठिंबा द्यावा. तसेच राजकारणात त्यांना यश नसल्याने राजकीय सन्यास घ्यावा, अशी मागणी केली होती. या वक्तव्याचा निषेध करत डॉ. कोरे यांच्या समर्थकांनी मंत्री पाटील यांनी राजीनामा देवून माफी मागावी, अन्यथा त्यांना फिरू न देण्याचा इशारा दिला.

तालुकास्तरावर शुक्रवारी (ता. 10) आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "दूधगंगा कृष्णा'चे उपाध्यक्ष भरतेश बनवने, संचालक मल्लिकार्जुन कोरे, अंकली ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंकली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वीरण्णा लठ्ठी यांनी बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: Belgaum News Protest in Ankali against Minister Patil