बेळगावातील खड्ड्यात चक्‍क राफ्टिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

बेळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत, की त्यांवरुन चालणेही मुश्‍कील झाले आहे. तरीही प्रशासन अद्याप ढिम्मच आहे. या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावातील एका ग्रुप व्हिडिओ गाणे चित्रित करत आहे.

बेळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत, की त्यांवरुन चालणेही मुश्‍कील झाले आहे. तरीही प्रशासन अद्याप ढिम्मच आहे. या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावातील एका ग्रुप व्हिडिओ गाणे चित्रित करत आहे. यांतर्गत रविवारी (ता. २२) संचयनी सर्कलजवळील खड्ड्यात एकजण राफ्टिंग करत असल्याच्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने वाहनचालकांसह येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

रेड एफएम रेडिओची आरजे मलिष्काने मुंबईतील खड्ड्यांवर आधारित गाणे सादर करुन महापालिका व महाराष्ट्र सरकारला जागे केले होते. या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मुंबईप्रमाणेच बेळगावही खड्डेमय झाले आहे. त्यामुळे, खड्ड्यांवर आधारित व्हिडिओ प्रसारित करुन प्रशासनाला जाग आणण्याचा निर्णय बेळगावच्या काही तरुणांनी घेतला. वरुण कारखानीस, राकेश नंदगडकर, संदीप पाळन्नवर, किशोर ठाकूर आणि पूजा ओझा हे पाचजण हा व्हिडिओ तयार करत आहे. वरुण यांनी हे गाणे रचले आहे. या गाण्याचे चित्रिकरण सुरु असून रविवारी संचयनी सर्कलजवळील खड्ड्यात वरुणने राफ्ट चालवून सर्वांचे लक्ष वेधले.

चित्रीकरण लवकरच पूर्ण होणार असून बेळगावचे खड्डेही संपूर्ण जगाला पाहता येणार आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर लहानमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी कुणीच पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आणण्यासाठी युवकांनी व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्हिडिओ प्रसारीत झाल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येते का ते पाहायचे.

सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मात्र, खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हिडिओ गाणे चित्रित करण्याचा निर्णय घेतला. ते लवकरच प्रसारित केले जाईल.
-वरुण कारखानीस

Web Title: Belgaum News Rafting in Potholes