राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात अडीच फूट वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

बेळगाव - पावसाच्या दमदार सलामीमुळे शहराच्या पाणी पुरवठ्याची अडचण तूर्तास दूर झाली आहे. पाणलोट क्षेत्रात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात अडीच फूट वाढ झाली आहे. सध्या जलाशयात सात फूट पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता करिअप्पा यांनी दिली. 

बेळगाव - पावसाच्या दमदार सलामीमुळे शहराच्या पाणी पुरवठ्याची अडचण तूर्तास दूर झाली आहे. पाणलोट क्षेत्रात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात अडीच फूट वाढ झाली आहे. सध्या जलाशयात सात फूट पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता करिअप्पा यांनी दिली. 

राकसकोप जलाशयात यंदा पुरेसा पाणीसाठा होता. जिवंत साठ्यात 10 जूनपर्यंत पुरेल इतके पाणी होते. मॉन्सूनला विलंब झाला तरी मृत साठ्यात 30 जूनपर्यंत पुरण्याइतपत पाणी होते. हिडकल जलाशयात एक टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाते.

राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपला तर केवळ हिडकल जलाशयातील पाण्यावरच बेळगावकरांना अवलंबून राहावे लागते. या दोन्ही जलाशयात पुरेसे पाणी असेल तरच शहराला सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. यंदा मान्सूनचे आगमन 9 व 10 जून रोजी जोरदार पाऊस झाला. त्यामुळेच राकसकोप जलाशयात पाण्याचा प्रवाह सुरु होऊन पातळी वाढली. त्यामुळे, बेळगावच्या पाणी समस्येवर तोडगा निघाला आहे. 

सोमवारी (ता. 11) सकाळी राकसकोप जलाशयाची पाणी पातळी 2,453 फूट इतकी होती. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप 22 फूट पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर वाढला तर पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. पण जूनच्या प्रारंभी दोन दिवसातच जलाशयाची पातळी अडीच फुटाने वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही वर्षात मॉन्सूनला विलंब झाल्यामुळे राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो होण्यास विलंब लागत आहे. दरवर्षी ऑगस्टच्या अखेरीस जलाशय ओव्हरफ्लो होते. पण, गतवर्षी जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस न झाल्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस जलाशय ओव्हरफ्लो झाला. पण, जलाशय विलंबाने भरल्याने मे अखेरपर्यंत पाणीसाठा कायम राहिला. 

शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी अडीच फुटाने वाढली आहे. पाऊस कायम राहिला तर यंदा जलाशय लवकर भरेल. राकसकोपमध्ये सात फूट पाणीसाठा असल्यामुळे बेळगावची पाणीटंचाई तूर्तास दूर झाली आहे. 
- करिअप्पा,
कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा मंडळ 

Web Title: Belgaum News Rakaskop waterstorage level increase by 2.5 feet