सिद्धेश्‍वर स्वामीजीनी नाकारला पद्मश्री पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाच्या माध्यमातून आध्यात्मीक मार्गदर्शन तसेच अनेक विधायक उपक्रम राबविणारे सिद्धेश्‍वर स्वामीजी संपूर्ण कर्नाटकात परीचीत आहेत. महाराष्ट्राच्या सीमाभागातही त्यांचे भक्त आहेत. अत्यंत साधी राहणी व उच्च विचार यामुळे त्यांचा भक्तवृंद मोठा आहे.

बेळगाव : केंद्र शासनाने जाहीर केलेला प्रद्मश्री पुरस्कार विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाच्या सिद्धेश्‍वर स्वामीजीनी नाकारला आहे. 25 जानेवारी रोजी केंद्र शासनाने सिद्धेश्‍वर स्वामीजीना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी रोजी स्वामीजीनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पत्र पाठवून हा पुरस्कार नाकारत असल्याचे कळविले आहे.

याबाबतचे पत्र त्यानी पंतप्रधानाना पाठविले आहे. प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार दिल्याबद्दल आपण भारत सरकारप्रती कृतज्ञ आहोत. पण भारत सरकार व पंतप्रधानांचा आदर ठेवून आपण हा पुरस्कार नाकारत असल्याचे त्यानी पत्रात नमूद केले आहे. आपण संन्यासी असल्यामुळे आपल्याला पुरस्कारांमध्ये स्वारस्य नाही असे कारण त्यानी दिले आहे.

विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाच्या माध्यमातून आध्यात्मीक मार्गदर्शन तसेच अनेक विधायक उपक्रम राबविणारे सिद्धेश्‍वर स्वामीजी संपूर्ण कर्नाटकात परीचीत आहेत. महाराष्ट्राच्या सीमाभागातही त्यांचे भक्त आहेत. अत्यंत साधी राहणी व उच्च विचार यामुळे त्यांचा भक्तवृंद मोठा आहे. शनिवारी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांच्या भक्तानी त्यांचे अभिनंदन केले, पण त्याचवेळी त्यानी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगीतले होते. त्यामुळे त्यांचे भक्त नाराज झाले होते. सिद्धेश्‍वर स्वामीजींप्रमाणेच बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथील सितव्वा जोडट्टी यानाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या सातव्या वर्षी देवदासी बनलेल्या सितव्वा नंतर त्या जोखडातून मुक्त झाल्या व त्यानी महिला कल्याणाचे कार्य जोरदारपणे सुरू केले. बेळगाव व विजापूर या जिल्ह्याना पद्मश्री पुरस्काराचा मान मिळाल्यामुळे सीमाभागात आनंदाचे वातावरण होते. पण सिद्धेश्‍वर स्वामीनी पुरस्कार नाकारून आपले वेगळेपण अधोरेखीत केले आहे.

Web Title: Belgaum news Siddheshwar Swami reject Padmashree award