मुख्यमंत्री कुमारस्वामींचे आगीत तेल ओतणारे वक्तव्य - येडियुराप्पा

महेश काशीद
मंगळवार, 31 जुलै 2018

आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असा आरोप विधानसभा विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये (ता.31) केला. 

बेळगाव - उत्तर कर्नाटकातून मला मते मिळाली नाहीत किवा निवडून आलो नाही. उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य मागतात कसे काय, स्वतंत्र राज्याची निर्मिती कशी होते, ते बघतो, असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उत्तर कर्नाटक भागातील आंदोलकांची माथी भडकविण्याचे प्रयत्न केले आहे. आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असा आरोप विधानसभा विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये (ता.31) केला. 

येडियुराप्पा म्हणाले,""स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य निर्मितीसाठी आंदोलने झाली. पण, यावेळी सुवर्णसौधला मोठे आंदोलन आहे. विकासात पिछाडी, अनुदान मिळत नसल्याच्या कारणाखाली भडका उडाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आंदोलकांची भेट घेऊन त्यांची क्षमा मागावी. विकासाबाबत आश्‍वासने द्यायला हवी होती त्याऐवजी आंदोलकांची डोकी भडकावून चीड निर्माण करण्याचा घाट घातला आहे. त्यातूनच आज आंदोलन आहे. 2 ऑगस्टला उत्तर कर्नाटक बंद ठेवण्याची हाक दिली आहे. पण, आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलकांकडे करणार आहे. विकासाबाबतचे आश्‍वासन त्यांना दिले जाईल.'' 

भाजप नेते श्रीरामलू, उमेश कत्ती यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी केली आहे. त्यामागे राज्याची तुकडे करणे हा मुळीच उद्देश नाही. भागाचा विकास साधणे आहे, हाच उद्देश आहे. 13 जिल्ह्यांचा दौरा करून आंदोलकांची भेट घेणार आहे. विधानसभा व सभागृह बाहेर आंदोलन करणार आहे. विविध सचिवालय बेळगावात हलवण्यात यावे, अशी मागणी आहे. याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले जाईल. तातडीने दहा ते बारा कार्यालये सुवर्णसौधला हलविले जावे, अशी मागणी करणार आहे. राज्यात भाजप पक्षाची सत्ता आल्यास 24 तासांमध्ये सचिवालय व विविध कार्यालये बेळगावला हलविले जाईल, अशी माहितीही येडियुराप्पा यांनी दिली. 

Web Title: Belgaum News Yediyurappa comment