जैन समाजाने बदलांचा अभ्यास करावा - जारकीहोळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

निपाणी - ‘भविष्यातील बदलांचा समाजातील युवकांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यातूनच समाज पुढे जाणार आहे. समाजातील शांतता शोधण्याची वेळ आली असताना जैन समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन नगरविकासमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.

निपाणी - ‘भविष्यातील बदलांचा समाजातील युवकांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यातूनच समाज पुढे जाणार आहे. समाजातील शांतता शोधण्याची वेळ आली असताना जैन समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन नगरविकासमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले. ते स्तवनिधी येथील ब्रह्मनाथ भवनात आयोजित दक्षिण भारत जैनसभेच्या ९८ व्या त्रैवार्षिक दोनदिवसीय अधिवेशनाच्या समारोपात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.

मंत्री जारकीहोळी म्हणाले, ‘‘समाजाला नवी दिशा देऊन पुढे नेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. युवकांसह नेते मंडळींनी एकत्रित येऊन आदर्श समाज निर्माण केला पाहिजे.  अल्पसंख्याक दर्जामुळे मिळणाऱ्या विविध योजना समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’

आमदार महांतेश कवटगीमठ यांनी, भविष्यात शिक्षित आणि अशिक्षित अशा दोनच जाती असणार असल्याने समाजबांधवांनी शिक्षित व्हावे, असे सांगितले. वैभव नाईकवडी यांनी, शिक्षणातील बदल स्वीकारण्याचे आवाहन केले. रावसाहेब पाटील यांनी, सभेचा विस्तार, व्याप्ती वाढत असून समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगितले. महेश कुमठहळ्ळी, माजी आमदार संजय पाटील यांची भाषणे झाली. 

मुनीच धर्मात फूट पाडतात ः प्रकाश आवाडे
प्रकाश आवाडे म्हणाले, ‘जैन धर्मातील मुनीच धर्मात फूट पाडत आहेत. माझ्या या विधानावर नक्की उलट्या प्रतिक्रिया उमटतील हे माहीत असूनही मी हे सत्य अधिवेशनात मांडत आहे. आपण पंचकल्याण पूजेवर जेवढा खर्च करतो त्याच्या निम्मा खर्च शिक्षणावर केला तर देशात कुठे नसतील अशा उच्च शिक्षणाच्या संधी आपल्या परिसरात उभ्या करू शकू.’

पंचकल्याणात पंचांचा विकास ः वीरकुमार पाटील
वीरकुमार पाटील म्हणाले, ‘‘ज्या गावात पंचकल्याण महोत्सव भरतो, त्या गावात समाजाचा नव्हे, तर पंचांचा विकास होतो. गावात एक मुनी येतात आणि गावात, समाजात दोन तट पाडून जातात. याकडे जैन समाजातील धुरीणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.’’ 

सर्व मुनी एका व्यासपीठावर यावेत ः अभय पाटील
आमदार अभय पाटील म्हणाले, ‘‘आम्ही तीन पक्षांचे तीन आमदार आहोत, पण समाजासाठी एका व्यासपीठावर येतो. आमच्यातील मतभेद बाजूला सारून समाजाच्या हितासाठी जे असेल त्यावर विचार कतो, पण समाजातील वेगवेगळे मुनी मात्र कधीच समाजासाठी एका व्यासपीठावर येत नाहीत. त्यामुळे समाजात दोन गट कायम कार्यरत राहतात.’’

Web Title: Belgaun News Deccan Bharat Jain Sabha conference