बेळगाव-गोवा महामार्ग बंदच, प्रवाशांचे प्रचंड हाल 

highway
highway

फोंडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 अ वरील केरये - खांडेपार येथे सोमवारी संध्याकाळी दरड कोसळल्याने धोकादायक ठरलेला हा महामार्ग कालपासून बंद असून शक्‍य तेवढ्या लवकर खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग आज खुला होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौपदरी रस्ता कंत्राटदाराला दोन दिवसांच्या आत रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिल्यामुळे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मात्र मुख्य रस्ताच बंद करण्यात आल्यामुळे मंगळवारी प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. 

विशेषतः फोंड्याला येणारे विद्यार्थी तसेच कामाधंद्याला जाणाऱ्या कामगारांना मोठा वळसा घालून फोंडा गाठावे लागले. फोंड्याला जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असल्यामुळे काही बसमालकांनी बसगाड्याच बंद केल्या त्यामुळे चालू असलेल्या बसगाड्यांवर ताण पडला आणि प्रवाशांची दैना उडाली. विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात सकाळी तर दुपारी घरी उशिरा पोचले. 

कुर्टी - खांडेपार चौपदरी रस्ता कामावेळी एमव्हीआर या कंत्राटदाराकडून डोंगर कपार कापताना निष्काळजीपणा झाल्यामुळेच दरड कोसळली. कोसळणाऱ्या दरडीमुळे रस्ता बंद झाल्याने शेवटी धोका नको म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता बंदचा आदेश काढला होता. खांडेपार ते फोंडा रस्ता वाहतुकीला बंद केल्यामुळे सकाळी उसगाव, पाळी, मोले तसेच खांडेपारहून फोंड्यातील शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय झाली. कामगार वर्गाला तर मिळेल ते वाहन पकडून बेतोडामार्गे किंवा सावईवेरे मार्गे फोंडा गाठावे लागले. त्यातच रस्ता बंद केल्यामुळे काही बसगाड्या बंदच ठेवण्यात आल्याने गैरसोयीत अधिकच भर पडली. कंत्राटदाराने चार दिवसांच्या आत रस्ता खुला करण्याची परवानगी मागितली होती, मात्र शक्‍य झाले तर येत्या चोवीस तासात हा रस्ता खुला केला जाऊ शकतो, तसे प्रयत्न सुरू आहेत असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. नियोजन न करता डोंगराची कपार उभी कापल्यामुळे ही दरड कोसळली असून आता धोकादायक ठिकाणी जोरात काम सुरू असून डोंगराची धोकादायक कपार कापून टाकल्यास हळूहळू वाहतूक सोडणे शक्‍य असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

सकाळी फोंड्याचे आमदार रवी नाईक तसेच फोंडा उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेतला. आमदार रवी नाईक यांनी युद्ध पातळीवर काम हाती घेण्याची सूचना केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही दरड कापण्याचे काम शक्‍य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दिवसभर काही तुरळक सरी वगळता पाऊस नसल्यामुळे दरड कापण्याचे काम जलदगतीने करणे शक्‍य झाल्याचे संबंधित कामगारांनी सांगितले. 
महामार्ग बंद केल्यामुळे कुर्टी तसेच खांडेपार - उसगावच्या बाजूला अवजड ट्रकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. उशिरा खांडेपार - उसगावातील अवजड ट्रक आमोणामार्गे सोडण्यात आले. तर कुर्टीतील काही ट्रक बेतोडा - दाभाळमार्गे सोडण्यात आले.

कालपासून ट्रक पार्क करून रस्ता मोकळा होण्याची वाट पाहणाऱ्या ट्रकचे चालक व क्‍लिनरच्या जेवणाखाणाचे हाल झाले. यावेळी ट्रकवाल्यांच्या वाहतूक संघटनेतर्फे चालक, क्‍लिनरला मोफत नाष्तापाणी देण्यात आले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत दरड कापण्याचे काम सुरू असताना काही स्थानिक लोकांनी रात्रीच्यावेळी काम करण्यास मनाई केली व काम बंद पाडले. त्यामुळे थोडा व्यत्यय आला, मात्र पुन्हा कामाला सुरळीत सुरवात झाली. दरम्यान, बेळगावहून येणारी वाहने दाभाळ किंवा आमोणेमार्गे सोडण्यात येत असून बेळगावला जाणारी वाहने साखळी, चोर्लामार्गे जाऊ देण्यात आली. खांडेपारहून फोंड्याला जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असल्यामुळे विद्यार्थी, कामगार तसेच स्थानिकांनी रस्ता त्वरित खुला करण्याची मागणी केली आहे. 

स्थानिकांचे हाल :
- विद्यार्थी, कामगारांचे प्रचंड हाल 
- प्रवासी वाहतुकीवर जास्त परिणाम 
- काही बसमालकांनी बसगाड्या केल्या बंद 
- अवजड मालवाहू ट्रक खोळंबले 
- 5 किलोमीटर अंतराऐवजी 15 किलोमीटरची पायपीट 
- पोलिसांकडून वाहतुकीवर नियंत्रण 
- आमदार रवी नाईक यांची पाहणी 
- मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून कामासंबंधी सूचना 
- सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ 
- दरड कापण्याचे काम जोरात सुरू 
- कामावेळी पाऊस नसल्याने थोडा दिलासा 

येत्या 24 तासात रस्ता खुला? 
दरड कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आल्याने प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रचंड गैरसोय झाली आहे. त्यामुळे दरड कापताना आवश्‍यक त्या धोकादायक ठिकाणी भर देऊन तेथील माती काढून धोका दूर करून एका बाजूने वाहतूक सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या 24 तासात हा महामार्ग खुला होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com