अधीर रंजन चौधरी यांची लोकसभेत काँग्रेस गटनेतेपदी निवड

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

पश्‍चिम बंगालमध्ये "तृणमूल' सोबतच कॉंग्रेसचेही काही नेते भाजपच्या संपर्कात असून, त्यामध्ये अधीर रंजन चौधरी यांचेही नाव असल्याची चर्चा रंगली होती. त्या पार्श्‍वभूमीवर गटनेतेपदी त्यांची झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे. 

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत खासदार अधीर रंजन चौधरी हे कॉंग्रेसचे गटनेते असणार आहेत. लोकसभेवर पाचव्यांदा निवडून आलेले अधीर रंजन हे पश्‍चिम बंगालमधील कॉंग्रेसचे एकमेव खासदार आहेत. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधातील त्यांच्या कट्टर भूमिकेमुळे लोकसभेमध्ये कॉंग्रेस आणि "तृणमूल' यांच्या समन्वयावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. 

सोनिया गांधी यांची कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड झाल्यानंतर लोकसभेत कॉंग्रेसचे नेतृत्व कोण करणार यावर वेगवेगळे अंदाज लढविले जात होते. पक्षाध्यक्ष राहुल गांधी ही जबाबदारी स्वीकारण्यास अनुत्सूक असल्याने लोकसभेवर दोन आकडी संख्येत खासदार पाठविणाऱ्या केरळ किंवा पंजाबमधील ज्येष्ठ खासदाराची वर्णी गटनेतेपदी लागू शकते, अशी चर्चा होती. त्यानुसार सहाव्यांदा लोकसभा खासदार बनलेले केरळमधील के. सुरेश यांच्याबरोबरच शशी थरूर, तसेच पंजाबमधून निवडून आलेले माजी मंत्री मनीष तिवारी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. परंतु माजी मंत्री आणि पश्‍चिम बंगाल प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेले अधीर रंजन चौधरींच्या गळ्यात अनपेक्षितपणे गटनेते पदाची माळ पडली. तर उपनेतेपदी के. सुरेश यांची निवड करण्यात आली आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये "तृणमूल' सोबतच कॉंग्रेसचेही काही नेते भाजपच्या संपर्कात असून, त्यामध्ये अधीर रंजन चौधरी यांचेही नाव असल्याची चर्चा रंगली होती. त्या पार्श्‍वभूमीवर गटनेतेपदी त्यांची झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे. 

कॉंग्रेसची संसदीय रणनीती ठरविण्यासाठी दोन्ही सभागृहांतील नेत्यांची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी झाली. राहुल गांधी, ए. के. ऍन्टनी, गुलाम नबी आझाद, जयराम रमेश, पी. चिदंबरम यांच्या सोबतच अधीर रंजन चौधरी, के. सुरेश हे देखील उपस्थित होते. त्या वेळीच हा निर्णय झाला होता. मात्र याबाबतची औपचारिक घोषणा कॉंग्रेसने सायंकाळी उशिरा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengal MP Adhir Ranjan Chowdhury is Congress leader in Lok Sabha