राज्यसभेतही कामकाजाचा विक्रम; वेंकय्या नायडू यांच्याकडून समाधान व्यक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मोदी-2 सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेबरोबरच राज्यसभेतही या अधिवेशनात लक्षणीय कामकाज झाल्याबद्दल राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज समाधान व्यक्त केले.

नवी दिल्ली -  मोदी-2 सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेबरोबरच राज्यसभेतही या अधिवेशनात लक्षणीय कामकाज झाल्याबद्दल राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज समाधान व्यक्त केले. अधिवेशन सांगतेच्या संबोधनात नायडू यांनी, एकाच अधिवेशनात 32 विधेयके मंजूर होणे हा मागील 17 वर्षांतला तर जनहिताचे 520 मुद्दे चर्चिले जाणे हा 20 वर्षांतला विक्रम असल्याचे नमूद केले.

20 जूनपासून सुरू झालेल्या  वरिष्ठ सभागृहाच्या 249 व्या अधिवेशनाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी मात्र सभागृहावर सुषमा स्वराज यांच्या अकस्मिक निधनाच्या दुःखाचे सावट होते. स्वतः नायडूंसह विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, सभागृहनेते थावरचंद हगेहलोत, कायदामंत्री रविॉशंकर प्रसाद आदींनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.

सरकारचे बहुमत नसल्याने राज्यसभेच्या कामकाजात अडथळे आले तरी त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. विविध महत्वाच्या मुद्यांवरील जी 32 विधेयके एकमताने किंवा सत्तारूढ नेतृत्वाच्या उत्तम फ्लोअर मॅनेजमेंटमुळे मंजूर झाली त्यात कलम 370 रद्द करणे, जम्मू काश्मीरचे विभाजन, तीनदा तलाक प्रथेवर बंदी, बालकांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा दुरूस्ती (पोस्को), मोडिकल कौन्सिल स्थापना, आणि यापूर्वी तीनदा राज्यसभेच्या वेसीवरून माघारी गेलेले मोटार वाहन कायदा दुरूस्ती विधेयक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेली सहा वर्षे येथे बहुमताअभावी झगडमाऱया सरकारला, विरोधकांच्या विरोधावर मात करण्याचा विश्वास सरकारला आला तो याच अधिवेशनात.

मागील 17 वर्षांत प्रथमच 32 विधेयकांना मंजुरी मिळविण्यात राज्यसभेला यश आले. यापूर्वी 2002 च्या 197 व्या अधिवेशनात 35 विधेयके मंजूर झाली होती. राज्यसभेत एका अधिवेशनात सर्वादिक 41 विधेयके मंजूर झाल्याचे वर्ष होते 1978. तो विक्रमही असेच कामकाज चालले तर फार दूर नाही असे नायडू यांचे मत आहे. 2014 ते 2019 या काळात राज्यसभेत नीचांकी कामकाज झाले त्यावेळेस पाच वर्षांत 88 विधेयके मंजूर झाली होती.

या अधिवेशनात राज्यसभेने 35 बैठकांमध्ये, प्रसंगी रात्री उशीरापर्यंत बसून 195 तास कामकाज केले. 2002 मध्ये 147 तास कामकाज चालले होते. 2005 नंतर प्रथमच राज्यसभेत इतका वेळ कामकाज चालले. यापूर्वी पहिल्या राज्यसभेत, 1952 मध्ये सर्वाधिक 40, तर 1955 च्या 9 व्या अधिवेशनात 50 बैठका झाल्या होत्या.

या अधिवेशनात राज्यसभेत 175 पैकी 151 तारांकित प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. प्रश्न विचारणे व उत्तरे देणे यातील फाफटपसारा टाळण्यास नायडू यांनी चांगलाच चाप लावल्याचे त्याचा परिणाम जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तरे देण्यात झाल्याचे स्पष्ट दिसते मागच्या 45 अधिवेशनांनंतर इतक्या जास्त संख्येने प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत.

जनहिताच्या 194 मुद्द्यांना विशेषओल्लेखांद्वारे मांडण्यात आले. मागच्या पाच वर्षांत मिळून ही संख्या 145 होती.शून्य प्रहरात विविध सदस्यांनी 326 मुद्द्यांवर भाषणे केली. हा गेल्या 20 वर्षांतील विक्रम आहे.

माध्यमांना कानपिचक्या
राज्यसभेने यावेळी अनेकदा उशीरापर्यंत बसून कामकाज चालविले. मात्र आम्ही येथे काम करतो तेव्हा वर प्रसारमाध्यम कक्षांतील उपस्तिती मात्र दिवस पुढए जाईल तशी रोडावत जाते अशा शब्दांत नायडू यांनी पत्रकारांनाही कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की माध्यमांना त्यांचे स्वातंत्र्य आहेच. पण जेवणाच्या सुटी आधी दिसणारी माध्यम कक्षांतील पत्रकारांची उपस्थिती नंतरच्या काळात रोडावत का जाते, हेही पाहिले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the best session in the last 13 years says Venkaiah Naidu