Bharat Bandh : सरकारकडून समाजात फूट : राहुल गांधी 

Bharat Bandh : The split in the society from the government: Rahul Gandhi
Bharat Bandh : The split in the society from the government: Rahul Gandhi

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असून, समाजातील वर्गावर्गांमध्ये या सरकारने भांडणे व संघर्ष पेटविल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सुरवात करण्यापूर्वी त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

आज सकाळी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रथम महात्मा गांधी यांच्या समाधिस्थानी राजघाटावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर राहुल गांधी हे तेथून चालतच रामलीला मैदानावर पोचले. रामलीला मैदानावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, शरद पवार, शरद यादव व अन्य प्रमुख विरोधी पक्षनेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकार हे देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असल्याची टीका केली. राफेल विमानांचा संशयास्पद व्यवहार, उद्योगपतींना लाभ मिळवून देणे, रोजगारनिर्मितीमध्ये अपयश आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्यांचा उल्लेख करून राहुल यांनी, आता लोकांना मोदींचा आणि त्यांच्या भाषणांचा व तेचतेच ऐकण्याचा कंटाळा व उबग आल्याचे सांगितले. विरोधी पक्ष एकत्र येत आहेत आणि त्याचा पुरावाच आंदोलनाने मिळत असून, आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यात येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, गेल्या सत्तर वर्षांत देशात कोणतीच प्रगती झाली नसल्याचे दावे वर्तमान राज्यकर्ते करीत असतात. परंतु, त्यांनी गेल्या चार वर्षांत देश कोणत्या स्थितीला आणला आहे, याचे पेट्रोल-डिझेलमधील विक्रमी दरवाढ हे ठळक उदाहरण असल्याचे सांगितले. शेतकरी, कामगार, युवक अशा सर्व वर्गांना या सरकारने संकटात टाकले आहे, असे ते म्हणाले. दिल्लीत बंद शांततेने पार पडला. ठिकठिकाणी कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, आप आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. बाकी सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने व स्थानिक वाहतूक हे सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. 

आक्रमक मनमोहनसिंग 
मनमोहनसिंग यांनी विलक्षण आक्रमक भाषण करताना सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले. लोकांना केलेले वायदे पूर्ण करण्यात भाजप पूर्णतया अपयशी ठरल्याचे सांगून, केंद्र सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे त्यांनी म्हटले. शेतकरी, लहान उद्योजक, तरुण वर्ग हे सर्व जण भविष्याबाबत चिंताग्रस्त असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

बिहारमधील जेहानाबाद येथे "भारत बंद'मुळे रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असलेल्या मुलीला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे भरपूर भांडवल भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी विलक्षण नाट्यमय पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच वेळात तेथील उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी खुलासा करून असे काही घडले नसल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com