आंदोलनाचा मार्ग काटेरी पण निर्धार ठाम

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 3 February 2021

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत दिल्लीमध्ये तळ ठोकण्याची तयारी दर्शविली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल गाझीपूर येथे जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेऊन या आंदोलनास पाठिंबा दिला. 

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची केंद्र सरकारने चौफेर नाकेबंदी करायला सुरुवात केली असली तरीसुद्धा शेतकरी मात्र कृषी कायदे रद्द केल्याशिवाय तसूभर देखील मागे हटणार नाही, या निर्धारावर ठाम आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत दिल्लीमध्ये तळ ठोकण्याची तयारी दर्शविली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल गाझीपूर येथे जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेऊन या आंदोलनास पाठिंबा दिला. 

केंद्र सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून प्रत्यक्ष संसदेत आणि संसदेबाहेर देखील चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीच्या सीमावर्ती भागाला छावणीचे रुप आले आहे. स्थानिक प्रशासनाने रस्त्यांवर काटेरी कुंपण उभारत खिळे देखील पेरल्याची बाब उघड झाली आहे.  प्रशासनाच्या या कृत्यावर विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना पूल उभारा, भिंती नव्हे असा टोमणा लगावला आहे. संसदेमध्येही विरोधकांनी आज शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

‘छळ थांबला तरच चर्चा’ 
केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून होणारा छळ थांबत नाही तोपर्यंत केंद्र सरकार सोबत कोणत्याही प्रकारची औपचारिक चर्चा केली जाणार नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये सरकारने जागोजागी बॅरिकेड उभारले आहेत. रस्त्यांवर खिळे देखील पेरण्यात आले असून काटेरी कुंपणही उभारण्यात आले आहे. अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक आणि इंटरनेट सेवा रोखण्यात आली आहे, असा दावा किसान मोर्चाकडून करण्यात आला.

संजय राऊत दिल्लीच्या सीमेवर 
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दुपारी गाझीपूर सीमेवर जाऊन टिकैत यांची भेट घेतली. मुख्य मंचाजवळ ते टिकैत यांना भेटले. २६ जानेवारीचा हिंसाचार ज्या पद्धतीने झाला तो शेतकरी आंदोलन दडपून टाकण्यासाठीचा प्रयत्न होता. महाराष्ट्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना शेतकऱ्यांच्या बरोबर आंदोलनात ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार उसळला असताना पोलिसांकडे लाठीहल्ला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून रोखत जबरदस्तीने बॅरिकेड्स पाडण्यात आले.
- जी. किशन रेड्डी, केंद्रीय गृहराज्यमंत्री

केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यात केवळ एका फोन कॉलचे अंतर आहे असा दावा करणाऱ्या पंतप्रधानांचा नंबर आम्हाला द्या. आम्ही त्यांना लगेच फोन करतो.
- राकेश टिकैत, शेतकरी नेते 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रत्यक्ष संसदेमध्ये आणि संसदेबाहेर देखील चर्चा करायला तयार आहे.
- नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री

केंद्र सरकारने पूल बांधावेत भिंती नव्हे.
- राहुल गांधी, नेते काँग्रेस

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait along with Shiv Sena Leader Sanjay Raut