भय्यूजी महाराजांना अखेरचा निरोप 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

कुहूचे सावत्र आईवर आरोप 
भय्यूजी महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने तिच्या सावत्र आईवर गंभीर आरोप केल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. कुहू आणि भय्यूजी यांच्या द्वितीय पत्नी डॉ. आयुषी शर्मा यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असत. या कौटुंबिक कलहाला भय्यूजी महाराज वैतागले होते. दरम्यान, आयुषी शर्मा यांनी मात्र मी कुहूला आवडत नसल्यानेच ती अशाप्रकारचे बेछूट आरोप करत असल्याचे म्हटले आहे. 

इंदूर (मध्य प्रदेश) : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज येथील भमोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी कुहू हिनेच त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. 

तत्पूर्वी भय्यूजी महाराज यांचे पार्थिव "सूर्योदय' आश्रमात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाराजांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून त्यांचे हजारो अनुयायी इंदूरमध्ये दाखल झाले होते. 

भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी दुपारी डोक्‍यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याने खळबळ निर्माण झाली होती. कौटुंबिक कलहातून आलेल्या नैराश्‍यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. भय्यूजी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली दुसरी चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यांनी त्यांचा सेवक विनायक याने माझ्या पश्‍चात सर्व आर्थिक व्यवहार पाहावेत असे म्हटले आहे. त्यांच्या या दुसऱ्या चिठ्ठीवरून विविध तर्कवितर्क लढविले जात असून, कौटुंबिक कलहामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याच्या दाव्यास पुष्टी मिळाली आहे. 

कुहूचे सावत्र आईवर आरोप 
भय्यूजी महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने तिच्या सावत्र आईवर गंभीर आरोप केल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. कुहू आणि भय्यूजी यांच्या द्वितीय पत्नी डॉ. आयुषी शर्मा यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असत. या कौटुंबिक कलहाला भय्यूजी महाराज वैतागले होते. दरम्यान, आयुषी शर्मा यांनी मात्र मी कुहूला आवडत नसल्यानेच ती अशाप्रकारचे बेछूट आरोप करत असल्याचे म्हटले आहे. 

पोलिसांची सावध भूमिका 
दरम्यान, भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी रोज विविध पैलू समोर येऊ लागल्याने या घटनेचे गूढ आणखीनच वाढले आहे. पोलिसांनी मात्र याबाबत आताच कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यास नकार दिला आहे. या आत्महत्येप्रकरणी कौटुंबिक कलहाचा एक पैलू समोर आला असला तरीसुद्धा हेच एकमेव यामागचे कारण नसेल, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक अजय शर्मा यांनी सांगितले. 

Web Title: Bhayyu Maharaj Funeral Last Ride Today In Indore