भैय्यूजी महाराज यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भैय्यूजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, की संस्कृती, ज्ञान आणि सेवा असे त्रिवेणी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार कायम समाजाला प्रेरित करत राहतील.

इंदूर : राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज (वय 50) यांनी आज (मंगळवार) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. 

भैय्यूजी महाराज हे इंदूरमध्ये वास्तव्यास होते. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग भागात असलेल्या त्यांच्या बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आज दुपारी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. इंदूरमधील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली होती. भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर का गोळी झाडली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. भैय्यूजी महाराज यांनी गेल्यावर्षीच दुसरा विवाह केला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या घरी कौटुंबिक कलह सुरु होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होते. याच कारणावरून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता आहे. भैय्यूजी महाराज यांना नुकताच मध्य प्रदेश सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते, की संतांसाठी पदाचे महत्त्व काही नसते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ते प्रसिद्ध होते. डिसेंबर 2011 मध्ये अण्णा हजारे आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली होती. त्यापूर्वीही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही त्यांची भूमिका बजावली होती.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भैय्यूजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, की संस्कृती, ज्ञान आणि सेवा असे त्रिवेणी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार कायम समाजाला प्रेरित करत राहतील.

Web Title: bhayyuji maharaj shoot himself dead