
राजस्थानमधील भिलवाडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री जेवण झाल्यानंतर एक महिला फिरायला बाहेर पडली होती. दरम्यान, तीन तरुणांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी महिलेचे कपडेही काढून घेतले. पीडित महिला रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत मदत मागत होती. जेव्हा ती महिला ओरडून रस्त्यावर मदत मागत होती तेव्हा लोकांनी तिला वेडी समजत मदत केली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलवाडा जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. काल (शनिवारी) रात्री जेवण करून एक महिला फिरायला बाहेर पडली होती. दरम्यान, तीन तरुणांनी तिचे अपहरण करून तिला जीपमध्ये बसवले. यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तिन्ही आरोपींनी महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर सोडले.
दरम्यान, एका व्यक्तीने महिलेचे म्हणणे ऐकले आणि त्यांनी संबधित माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेला अंग झाकण्यासाठी जीपचे सीट कव्हर देण्यात आले. त्यानंतर पिडीत महिलेला पोलीस ठाण्यात नेले. यानंतर महिला कॉन्स्टेबलकडून कपडे मागवून तिला देण्यात आले. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून भिलवाडा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विमल सिंह नेहरा हेही गंगापूर येथे पोहोचले. घटनास्थळावरून पोलिसांना आक्षेपार्ह साहित्यही सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. ज्यांनी महिलेचे अपहरण केले ते दारूच्या नशेत होते, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांना घटनास्थळी पिडीत महिलेच्या तुटलेल्या बांगड्या सापडल्या आहेत. गंगापूर शहरात घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी आरोपींनी अटक करून न्यायाची मागणी केली आहे. यासंबधीचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
घटनेबाबत पोलीस उपअधीक्षक काय म्हणाले?
या घटनेबाबत गंगापूरचे पोलीस उपअधीक्षक लभुराम बिश्नोई म्हणाले की, पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली होती. यानंतर महिलेला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.