डुकरामुळे मुख्यमंत्र्यांवर ताटकळत बसण्याची वेळ

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

हेलिकॉप्टरच्या घिरट्या आणि पोलिसांची धांदल

भोपाळ: सतना जिल्ह्यातील बीरसिंहपूर येथे आलेल्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना एका डुकरामुळे हवेत ताटकळत बसण्याची वेळ आली. त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत असताना तेथे आलेल्या डुकराने सुरक्षा कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक करत चौहान यांना प्रतीक्षा करायला भाग पाडले.

चौहान हे चित्रकूट आणि बरौंधा येथील कार्यक्रम आटोपून बीरसिंहपूर येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. त्यांचे हेलिकॉप्टर येथे उतरणारच तितक्‍यात एक डुक्कर अचानक हेलिपॅडवर आल्यामुळे गोंधळ उडाला. तेथे उपस्थित नागरिकांची गर्दी पाहून भांबवलेले हे डुक्कर हेलिपॅडवर सैरावैरा धावत सुटले आणि मग सुरू झाला पकडापकडीचा खेळ.

चौहान यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी या डुकराला हेलिपॅडवरून हुसकावून लावण्यासाठी त्याच्या मागे धावत होते. धावता धावता त्यापैकी एक जण पडला; मात्र डुक्कर काय हार मानायला तयार नव्हते. अखेर या कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक केल्यानंतर ते तेथून पळून गेले. त्यानंतर चौहान यांची 15 मिनिटांची प्रतीक्षा संपुष्टात आली. त्यांचे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे हेलिपॅडवर उतरले आणि सर्वांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.

चालकाचे प्रसंगावधान
हेलिपॅडवर सुरू असलेला डुकराचा हा धुडगूस पाहून हेलिकॉप्टरच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत ते तत्परतेने पुन्हा वर नेले. यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारावरून एकूणच सुरक्षेतील त्रुटीही समोर आल्या.
 
Web Title: bhopal news shivraj singh chauhan helicopter and Pigs