
Bhupender Yadav : अधिकारी करणार नामिबिया, द.आफ्रिकेचा दौरा - भूपेंद्र यादव
भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामीबिया, दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्प अधिकाऱ्यांना नामीबिया, दक्षिण आफ्रिकेच्या अभ्यासदौऱ्यावर पाठविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज दिली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याबरोबर त्यांनी बैठक घेतली. आपण कुनो उद्यानाला सहा जूनला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी मार्चपासून आत्तापर्यंत कुनोत सहा चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
भूपेंद्र यादव म्हणाले, की चित्त्यांचे पुनरुज्जीवन आणि सुरक्षिततेसाठी पैसा आणि इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्य चित्त्यांच्या अधिवासासाठी पर्याय म्हणून तयार केले जात आहे.
गेल्या वर्षी कुनो उद्यानात नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यानातील विशेष भागात त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते या उद्यानात आणले.
कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची संख्या क्षमतेपेक्षा कमी आहे. मात्र, उद्यानात चित्त्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे आपण व्यथित आहोत. जगभरात चित्त्यांच्या बछड्यांचा जन्मदर कमी आहे. मात्र, केंद्र सरकार चित्त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल.
- भूपेंद्र यादव, केंद्रीय वनमंत्री