RSS ला मोठा झटका! केरळात 1200 मंदिरांमध्ये शाखा घेण्यावर बंदी; त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RSS

RSS ला मोठा झटका! केरळात 1200 मंदिरांमध्ये शाखा घेण्यावर बंदी; त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचा निर्णय

त्रावणकोर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) केरळमध्ये मोठा झटका बसला आहे. कारण इथल्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डानं (टीडीबी) आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या १२०० मंदिरांमध्ये संघाचं ड्रील आणि शाखा घेण्यास बंदी घातली आहे. तसेच इतर कोणतेही कार्यक्रम आरएसएसला घेता येणार नाहीत. यामुळं केरळमध्ये राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे. (Big blow to RSS ban in 1200 temples in Kerala Decision of Travancore Devaswom Board)

त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या अंतर्गत दक्षिण भारतातील १२०० हिंदू मंदिरं येतात. हे बोर्ड म्हणजे या मंदिरांचं नियोजन करणारी एक वैधानिक आणि स्वायत्त मंडळ आहे. याचं मंडळानं आपलं ताजं परिपत्रक काढलं आहे. यामध्ये बोर्डानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा, ड्रील आणि इतर कुठलेही कार्यक्रम मंदिरांमध्ये घेण्यास बंदी घातली आहे. तसेच बोर्डाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच मंदिर प्रशासनाचे जे अधिकारी याचं पालन करणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, हे पहिल्यांदाच होत नाहीए की टीडीबीनं संघाविरोधात अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सन २०१६ मध्ये टीडीबीनं मंदिरांच्या परिसरात संघाकडून हत्यारांचं प्रशिक्षण देण्यास प्रतिबंध घातले होते. तसेच ३० मार्च २०२१ रोजी एका आदेशाद्वारे मंदिर परिसराचा उपयोग मंदिरांचे कार्यक्रम आणि सणांशिवाय इतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी वापर केला जाऊ नये असे आदेश काढले होते.

त्रावणकोर देवास्वोम बोर्डाचे अध्यक्ष अनंतगोपन यांनी म्हटलं की, "आरएसएसच्या शाखा अनेक मंदिरांमध्ये सुरु होत्या. तसेच त्या ठिकाणी त्यांच ड्रिलही व्हायचं. यामुळंच अशा प्रकारचं परिपत्रक काढण्यात आलं आहे. मंदिरं भाविकांसाठी असतात आणि त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये हीच बोर्डाची भूमिका आहे"

टीडीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "हे केवळ आरएसएससाठीच नव्हे तर इतर कोणत्याही पक्षांना इतर कोणत्याही उद्देशानं मंदिर परिसराचा वापर करता येणार नाही. तसेच बोर्डाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी आणि उपसमूह अधिकाऱ्यांही अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यासाठी योग्य पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवालही सादर करण्यास सांगितलं आहे.

टॅग्स :Desh news