बिहारमध्ये गंगेत बोट उलटून 21 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

विरोधकांची सरकारवर टीका
या दुर्घटनेनंतर भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. स्थानिक प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे भाजप नेते प्रेमकुमार यांनी सांगितले. संयुक्त जनता दलाने उद्या (ता.14) आयोजित करण्यात आलेला दही चुरा कार्यक्रम रद्द केला आहे. या दुर्घटनेनंतर पाटणा शहरावर शोककळा पसरली आहे.

पाटणा - येथे "एनआयटी' घाटाजवळ आज सायंकाळी एक प्रवासी बोट गंगा नदीमध्ये उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये 21 जण मृत्युमुखी पडले असून, अन्य वीसपेक्षाही अधिक प्रवासी बेपत्ता झाल्याने मृतांची संख्या वाढू शकते. या बोटीतून चाळीसपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.

या दुर्घटनेतील काही जखमींना पाटण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला. दोन तास उलटून गेल्यानंतर निमलष्करी दलाच्या तुकड्या घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांना स्थानिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. या बोटीवरील बहुतांश प्रवासी येथील शासकीय पतंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, या बोटीत क्षमतेपेक्षाही जास्त प्रवासी भरण्यात आल्याने ती बुडाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सर्व लोक दायरा भागात आयोजित पतंग महोत्सव आटोपून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 19 लोक हे नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. मृतांमध्ये स्त्रिया आणि बालके यांची संख्या अधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र ही बोट अन्य एका दुसऱ्या बोटीस धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी गंगा किनाऱ्यावर पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

विरोधकांची सरकारवर टीका
या दुर्घटनेनंतर भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. स्थानिक प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे भाजप नेते प्रेमकुमार यांनी सांगितले. संयुक्त जनता दलाने उद्या (ता.14) आयोजित करण्यात आलेला दही चुरा कार्यक्रम रद्द केला आहे. या दुर्घटनेनंतर पाटणा शहरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Bihar: 21 feared dead, several missing in boat capsize