Bihar Election 2020: बहुमताचा आनंद पण जल्लोष नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

लोकसभा किंवा राज्यांमध्येही भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत मिळते त्यावेळेस असणारे आनंदी वातावरण आजही होते पण दिवसभर जल्लोषाचा मागमूसही नव्हता. 

बिहार विधानसभा निकालाचे कल येत असताना व भाजप आघाडी (एनडीए) सत्तारूढ होऊ शकते, हे दुपारी तीनच्या सुमारास स्पष्ट झाल्यावरही भाजप नेते दिवसभर उत्साहात पण सावधपणे वावरताना दिसले. लोकसभा किंवा राज्यांमध्येही भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत मिळते त्यावेळेस असणारे आनंदी वातावरण आजही होते पण दिवसभर जल्लोषाचा मागमूसही नव्हता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाटणा भाजप कार्यकर्त्यांचा शंखनाद व फटाक्‍यांचा आवाज भाजप मुख्यालयात फक्त दूरचित्रवाणीवरून ऐकायला मिळत होता. बिहारचे निकाल स्पष्ट होऊ द्या, मग बघू असे भाजप प्रवक्‍ते सारा दिवस एका सुरात सांगत होते. मात्र मध्य प्रदेश-गुजरातसह ११ राज्यांपैकी बहुतेक साऱ्या राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने आजच कॉग्रेसला चितपट करून एकहाती बाजी मारली त्याबद्दलचा आनंदही झाला नाही का, असे वातावरण दुपारपर्यंत दिसत होते. वारंवार रंग बदलणारे निवडणुकीचे कल सायंकाळी स्पष्ट झाल्यावर नेत्यांच्या हालचाली थोड्याशा वाढल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सायंकाळी अभिनंदनाचा फोन केला; पण नेमकी चर्चा काय झाली हे भाजपमधून बाहेर आले नाही. नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फेरविचार करा, असा दबाव बिहारच्या नेत्यांकडून भाजप नेतृत्वावर आल्याची माहिती आहे.  पंडित दीनदयाळ उपाध्ये रस्त्यावरील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात दर वेळी सकाळपासून दिसणारा विजयाचा जल्लोष, फटाके, मिठाई वगैरे आज दुपार उलटली तरी का दिसत नाही? असे विचारता एका नेत्याने अजून नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करायचे की नाही तेच ‘वर’ ठरले नाही तर बाकी काय बोलणार? अशी टिप्पणी केली. पण पुढच्याच क्षणी ‘हे सारे ऑफ द रेकॉर्ड ठेवा’, असे म्हणून त्यांनी हातच जोडले. ते म्हणाले, की आत्ता आम्हाला काही माहिती नाही.'' 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  एक्झिट पोलबाबत साशंकता
भाजप एनडीएचा विजय स्पष्ट झाल्यावर विजयंत पांडा मुख्यालयात आले व त्यांनी, मतदानोत्तर चाचण्याची पद्धती मीडियावाल्यांनी बदलायला हवी, असे मत मांडले. जर तुम्ही जनतेची नाडीच ओळखू शकत नसाल तर असे एक्‍झिट पोल जनतेला संभ्रमात टाकण्यासाठी दाखवतातच कशाला, असे सांगून पांडा म्हणाले, की नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा बिहारला विकासाच्या मार्गावर घेईन जाणार हे पंतप्रधानांपासून सारे जण सांगत असताना हे भलतेच दावे करणारे एक्‍झिट पोल कसे तयार झाले, हे गूढ आहे. पक्षनेते सुदेश वर्मा यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्‍वासार्हता सध्या देशभरात सर्वोच्च आहे. 

पदाधिकाऱ्यांची पाठ
भाजप मुख्यालयात वाहिन्या व प्रसारमाध्यमांसाठी नेहमीप्रमाणे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला होता. सकाळी नेमून दिलेले प्रवक्ते आपापल्या वाहिन्यांच्या कक्षांत होते. मात्र अनेक केंद्रीय मंत्री तर सोडा, पण बहुतांश वरिष्ठ संघटनात्मक पदाधिकारीही इकडे सायंकाळपर्यंत फिरकले नाहीत. भारत माता की जयच्या घोषणाही नव्हत्या. मुख्य प्रवक्ते संजय बलुनी यांच्याऐवजी बिहारचे आमदार संजय मयूख व त्यांचे निवडक सहकारीच बहुतेक दिवसभर माध्यमांना हॅंडल करताना सारी सूत्रे सांभाळत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Assembly results bJP political party