सुशांतच्या प्रकरणावर बिहारमध्ये भाजप लढतंय निवडणूक, स्लोगनसह फोटो छापलेलं स्टिकर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण होत असल्याचे आरोप अनेकदा झाले होते.

पटना - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळी वळणं घेत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्यात आली होती. त्यानंतर आत्महत्या की मृत्यू याचा तपास सुरु असतानाच ड्रग्जची लिंक लागल्यानंतर नार्कोटिक्स विभागाने आता काही जणांना अटकही केली आहे. त्यामुळे आत्महत्या प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचलं आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यू प्रकरणात बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण होत असल्याचे आरोप अनेकदा झाले होते. आता ते खरे ठरण्याची शक्यता दिसत आहे.

बिहारच्या निव़डणुकीत सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून भाजपने एक स्टिकर काढलं आहे. यामध्ये ना भूले है, ना भूलने देंगे असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीत सुशांतसिंह राजपूतच्या मुद्दा प्रत्येक पक्षाकडून वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

भाजप नेते वरुण कुमारसिंह यांनी म्हटलं की, सुशांतसिंह राजपूतला न्याया देण्यासाठी सुरुवातीपासून आम्ही आवाज उठवला. त्याचा फोटो गाडीवर लावण्यात आला असून त्यावर जस्टिस फॉर सुशांत असं लिहिलं आहे. याशिवाय 'ना भूले हैं! ना भूलने देंगे!!' असं लिहून भाजपचं निवडणूक चिन्ह कमळसुद्दा छापण्यात आलं आहे. फक्त स्टिकरच नाही तर भाजपने सुशांतसिंगबद्दल एक स्लोगनही लाँच केली आहे. त्यामुळे सुशांतसिंहच्या मृत्यूचं प्रकरण बिहार निव़डणुकीचं वातावरण तापवणार हे नक्की झालं आहे. भाजपने आता याची सुरुवात केली असून आता इतर पक्षांकडूनही याचे राजकारण केलं जाईल. 

Image

आरजेडीनेसुद्धा सुशांतसिंह प्रकरणी अनेक वक्तव्ये केली आहेत. तेजस्वी यादव यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे सोपवण्यावरून नितीश कुमार यांच्यावर बऱ्याचदा टीका केली आहे. रालोआमधील सहकारी पक्ष लोक जन शक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनीही  नितीश कुमार यांना पत्र लिहिलं होतं. चिराग पासवान यांनी सीबीआयच्या तपासाला उशीर केल्यावरून हल्लाबोल केला होता. 

हे वाचा - उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर

मुंबईत 14 जूनला सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ उडाली होती. प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर ही हत्या असल्याचे आरोप केले गेले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली. तर सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह पाच जणांवर आरोप केल्यानंतर मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. 

बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्तीने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने या दोघांच्या याचिका फेटाळून तपास सीबीआयकडे सोपवला. सध्या या प्रकरणात ईडी आणि एनसीबी ड्रग्जच्या अँगलनं चौकशी करत आहे. रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडासह त्याच्या घरातील कामगाराला ताब्यात घेतलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar bjp sticker with sushant singh rajput photo viral