
New Parliament House : नव्या संसदेची गरज नव्हती, तिथं जाणं व्यर्थ…; नितीश कुमार संतापले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या सोहळ्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेससहित २१ विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे.
यादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. नितीश कुमार यांनी नवीन संसद भवन बांधण्याची गरज नव्हती,तसेच सरकारला इतिहास बदलायचा आहे असे म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, सुरूवातील हे (संसद भवन) बांधले जात असल्याची चर्चा होत होती, तेव्हा देखील आम्हाला आवडलं नव्हतं. हा इतिहास आहे, स्वातंत्र्यानंतर गोष्टी ज्या ठिकाणी सुरू झाल्या त्या तेथेच विकसीत केल्या पाहिजेत. त्या वेगळ्या उभ्या करण्यात काही अर्थ नाही.
तुम्ही जुना इतिहास बदलून टाकाल का? नवीन संसद भवन बनवलं जाणं मला पसंत पडलेलं नाही. यांना फक्त इतिहास बदलायचा आहे. नवे संसद भवन बांधायला नको होते. जुन्या संसद भवनामध्येच सुधारणा केली पाहीजे होती. मी याच्या विरोधात आहे. तिथं जाणं देखील व्यर्थ आहे. तेथे जाण्यात काहीच अर्थ नाही. तेथे जाण्याची आणि ते संसद भवन बांधण्याची काही गरज नाहीये.
विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारावर बोलताना नितीश कुमार म्हणाले की, राजकीय पक्ष राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याने ते या कार्यक्रमाला जाणार नाहीयेत, मात्र मला वाटतं की नवीन संसद भवन बांधण्याची गरज नव्हती. होती ती इमारतच दुरुस्त करता आली असती. जे सध्या सत्तेत आहेत ते इतिहास बदलून टाकतील. स्वातंत्र्याचा इतिहास देखील बदलून टाकतील. देशाचा इतिहास खूप आवश्यक आहे.