बिहार चमकवला नाही, तर मते मागणार नाही - लालू

उज्ज्वलकुमार
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आता बहुदा स्वप्नरंजनातच आनंद वाटू लागला आहे. आपल्या कारकिर्दीत आपण बिहारला रेल्वेप्रमाणे चमकवू, अशी ग्वाही देतानाच ते जमले नाही तर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत मते मागणार नाही, असा दावा त्यांनी केला. रेल्वे मंत्रिपदाच्या आपल्या कारकिर्दीत आपण रेल्वेचा चेहरा-मोहराच बदलल्याचे ते म्हणाले.

बिहारमध्ये सध्या संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि राजदचे संयुक्त सरकार सत्तारूढ आहे. या आघाडीत राजदकडे जास्त जागा असून, त्यापाठोपाठ मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या जागा आहेत. जागा जास्त असल्यामुळे राजदवरील कामाची जबाबदारी जास्त आहे आणि आम्ही काम करूनच दाखवू, असे लालूप्रसाद यांनी सांगितले. लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यात मतभेद होऊन सरकार पडेल या आशेवर भाजप बसला असल्याची टीका करून ते म्हणाले, की भाजपने कितीही प्रयत्न केले, तरी आमचे सरकार पडणार नाही. नितीशकुमार यांच्याबरोबर आमची आघाडी तुटणार नाही.

पत्रकारांबरोबर बोलताना लालूप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की सीमेवर रोज गोळीबार सुरू आहे. आमचे जवान हुतात्मा होत आहेत. कुठे गेली नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती? भाजपचे सरकार असल्यावर सीमेवर हुतात्मा होणाऱ्या जवानांची संख्या वाढते, असा आरोप त्यांनी केला आणि कारगिल संघर्ष भाजपच्या काळातच झाल्याची आठवण करून दिली. मोदी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा टोलाही त्यांनी मारला. मोदींचे सरकार येऊन दोन वर्षे झाली; पण कोणाच्याही खात्यात 15 लाख रुपये जमा झाले नाहीत, परदेशातून काळा पैसा आला नाही आणि युवकांना रोजगारही मिळत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: bihar development voting demand by laluprasad yadav