राजकारणात नाईलाज असतो, पण मी NDA बरोबरच; तिकीट नाकारल्यानंतर गुप्तेश्वर पांडेंचं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

माझ्या शुभचिंतकांच्या फोनमुळे मी त्रस्त आहे. मी त्यांची चिंता समजू शकतो. माझ्या सेवानिवृत्तीनंतर मी निवडणूक लढेन अशी अपेक्षा होती.

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा गुप्तेश्वर पांडे यांचीच सुरु आहे. निवडणूक लढवण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेणारे बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी मिळालेली नाही. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. याचदरम्यान, गुप्तेश्वर पांडे यांनी आपले मौन सोडले आहे. 'मी निवडणूक लढवणार होतो. पण राजकारणात अनेकवेळा नाईलाज असतो आणि त्यामुळे मला तिकीट मिळालेले नाही. पण तरीही मी एनडीएबरोबरच आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी 'एएनआय'शी संवाद साधताना म्हटले की, माझ्या स्वेच्छानिवृत्तीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा निवडणुकीशी संबंध जोडणे योग्य नाही. निवडणूक लढण्याची शक्यता होती. परंतु, काही कारणास्तव हे समीकरण जुळू शकले नाही. राजकारणात अनेकवेळा नाईलाज असतो. पण मी एनडीएबरोबर आहे आणि एनडीएबरोबरच राहणार. 

दरम्यान, बुधवारी जेडीयूने 115 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात गुप्तेश्वर पांडे यांच्या नावाचा समावेश नव्हता. जेडीयूने आपल्या हिस्यात आलेल्या 122 जागांपैकी 7 जागा आपला सहकारी पक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा सेक्यूलरला दिल्या आहेत. गुप्तेश्वर पांडे बक्सरमधून इच्छुक होते. परंतु, ही जागा भाजपच्या खात्यात गेली आहे. 

हेही वाचा- राहुल गांधी इतक्या चांगल्या दर्जाची नशा कुठं करतात? भाजप मंत्र्याचा सवाल

उमेदवारांच्या यादीतून नाव वगळल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी बुधवारी फेसबुक पोस्ट केली होती. माझ्या शुभचिंतकांच्या फोनमुळे मी त्रस्त आहे. मी त्यांची चिंता समजू शकतो. माझ्या सेवानिवृत्तीनंतर मी निवडणूक लढेन अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा मी विधानसभा निवडणूक लढत नाहीये. यामुळे निराश होण्याची गरज नाही, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election 2020 Gupteshwar Pandey says i am with NDA after not getting ticket From JDU BJP