Bihar Election: 10 लाख सरकारी नोकऱ्या, कर्जमाफी, बेरोजगारी भत्ता; तेजस्वींचीही आश्वासनांची खैरात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

मागास आणि दलित विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्यांना लॅपटॉप दिले जातील.

पाटणा Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आपला निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. राज्यातील युवकांना 10 लाख नोकऱ्या देण्याच्या आपल्या आश्वासनाचा प्रामुख्याने उल्लेख त्यांनी केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगार भत्त्यासह अनेक मोठ्या घोषणाही करण्यात आल्या. पाटणा येथे आयोजित या कार्यक्रमात आरजेडीचे नेते तेजस्वी यादव, मनोज झा यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. 

शिक्षण, मोफत लॅपटॉप, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

राज्यातील 10 लाख युवकांना नोकरी, कंत्राटी पद्धत रद्द करणे, सर्वांना समान काम-समान वेतन आदी लोकप्रिय घोषणा तेजस्वी यादव यांनी केल्या. सरकारी विभागांचे खासगीकरण बंद केले जाईल. नियोजित शिक्षकांना समान वेतनमान, कार्यकारी सहाय्यक ग्रंथपाल उर्दू शिक्षकांना पुन्हा नियुक्त केले जाईल, बिहारी युवकांना सरकारी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी शूल्क लागणार नाही. त्याचबरोबर येण्या-जाण्याचा प्रवासखर्चही सरकार देईल. 

अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्याचे उत्पादन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीवर बोनस दिला जाईल. व्यापाराच्या संरक्षणासाठी औद्योगिक क्षेत्रात व्यापार सुरक्षा पथक तयार केले जाईल.

हेही वाचा- 'ज्यांच्या जावयाने शेतकऱ्यांची जमीन खाल्ली ते दुसऱ्यांच्या जमिनी काय वाचवणार'

प्रथमच शिक्षणावर 22 टक्के अर्थसंकल्प जाहीर केला जाईल. नेतरहाटच्या धर्तीवर सर्व ब्लॉकमध्ये शाळा सुरू केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात 3 ते 5 निवासी शाळांची स्थापना. सर्व शासकीय व अशासकीय शाळांमध्ये मातृभाषेसह इंग्रजी व संगणक शिक्षण सक्तीचे केले जाईल. मागास आणि दलित विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्यांना लॅपटॉप दिले जातील. सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्यात येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election 2020 Rjd Released Party Manifesto 10 Lakh Jobs Loan Waiver Of Farmers