Bihar Election: तेजस्वींचा आज वाढदिवस, बिहारची जनता देणार मोठं 'गिफ्ट' ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

तेजस्वी यादव यांचे बंधू तेजप्रताप यांनी 'Happy Birthday tutu..' असे टि्वट केले आहे.

नवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान शनिवारी संपुष्टात आले. मंगळवारी (दि.10) मतमोजणी आहे. सर्वांचे लक्ष आता तिकडे लागले आहे. बिहारची सत्ता कोणाच्या हाती येईल, यावरील पडदा लवकरच उठणार आहे. परंतु, बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला फायदा होणार असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे महाआघाडीची धुरा सांभाळणारे आरजेडीचे तेजस्वी यादव यांचा आज (दि.9) वाढदिवस आहे. जर एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरली तर तेजस्वी यांचे मुख्यमंत्री पद जवळपास निश्चित मानले जाते. असे झाले तर बिहारच्या जनतेकडून त्यांच्यासाठी हे सर्वात मोठे 'राजकीय गिफ्ट' ठरेल. परंतु, सर्व स्थिती मंगळवारी स्पष्ट होईल.

'एनडीटीव्ही'च्या 'पोल ऑफ पोल्स'नुसार, बिहारमधील चुरशीच्या लढतीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडी भाजप-जेडीयूला भारी ठरु शकते. पोल ऑफ पोल्सनुसार तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला सर्वाधिक 128 जागा, भाजप-जेडीयूच्या युतीला 99, लोजपाला 6 आणि इतरांना 10 जागा मिळू शकतात. बिहारमधील 243 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. 

हेही वाचा- ममता दिदींच्या कार्यकर्त्यांनो सुधरा, नाहीतर स्मशानात पाठवू, भाजप नेत्याची धमकी

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. आरजेडीने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, सर्व शुभचिंतक आणि समर्थकांना आम्ही न्रमपणे विनंती करतो की त्यांनी आपल्या घरातच राहावे. निवासस्थानी गर्दी करु नये. साधेपणाने वाढदिवस साजरा करावा. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी आपल्या भागात सतर्क राहा. 

हेही वाचा- Bihar election 2020 : काँग्रेसला वेध सत्तास्थापनेचे

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तेजस्वी यांना शुभेच्छा दिल्या. तेजस्वी यादव यांना ऐतिहासिक वाढदिवसाच्या आणि अति उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, असे टि्वट त्यांनी केले आहे. तर तेजस्वी यादव यांचे बंधू तेजप्रताप यांनी 'Happy Birthday tutu..' असे टि्वट केले आहे. आता मंगळवारी मतमोजणीत काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election 2020 tejashwi yadav birthday