Bihar Election: भाजप मोठा भाऊ ठरल्यास नितीश कुमार सोडणार मुख्यमंत्रीपदाचा हट्ट?

NITISH KUMAR
NITISH KUMAR

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्याच्या कलांनुसार संयुक्त जनता दल आणि भाजपला आघाडी मिळताना दिसत आहे. यंदाची निवडणूक जेडीयू-भाजप यांनी समसमान जागांवर लढवलीये. विषेश म्हणजे राज्यात भाजपला एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. बिहारमध्ये नेहमी मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या जेडीयूला कमीपणा घ्यावा लागणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जर भाजप राज्यात मोठा भाऊ ठरला, तर मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे जाणार का? तसेच नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

जेडीयूला कमी जागा मिळाल्यास नितीश कुमारांवर प्रचंड दबाव असणार आहे. जागा कमी झाल्या आणि भाजपच्या वाढल्या, तर नितीश कुमारांचे महत्व नक्कीच कमी होणार आहे. पण, नितीश कुमार आपल्या सोयीनुसार दल बदलू शकतात. त्यामुळे भाजप काहीशा सावध पवित्र्यात असणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने स्पष्ट केलं होते की, एनडीएचेच सरकार येणार आणि नितीश कुमार मुख्यमंत्री बनणार. भाजप मोठा भाऊ ठरल्यास त्यांचा हा निर्णय सहजासहजी बदणार नाही. आपण आपल्या शब्दांपासून फिरतो, असं भाजपला दाखवायचं नाही. शिवाय महाष्ट्रासारख्या राज्यात हात पोळला असल्याने सुरुवातीच्या काळात तरी मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांकडे दिले जाईल. पण, नितीश कुमारांचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु राहतील. शिवाय त्यांना केंद्रात घेण्याचे आमिषही दाखवले जाऊ शकते. नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते केंद्रात जाण्याच्या पर्यायाचा विचार करु शकतात.  

नितीश कुमारांकडे गमावण्यासारंख काही नाही!

नितीश कुमार राजकारणाच्या सुरुवातीपासूनच पॉवर गेम खेळत आले आहेत. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत सत्ता बनवली, त्यानंतर लालूंना सोडून ते भाजपमध्ये आले. सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून नाकारणाऱ्या नितीश कुमारांनी नंतर त्यांचे नेतृत्त मान्य केलं. आणि भाजपसोबत मिळून बिहारमध्ये यशस्वीपणे सरकार चालवलं. त्यामुळे नितीश कुमार काय करतीय हे नेमकेपणानं सांगता येत नाही. नितीश कुमारांनी ही निवडणूक त्यांच्यासाठी शेवटची असल्याचं म्हटलंय. त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखं असं काही नाही. भाजप मोठा भाऊ ठरला, तरी नितीश कुमार आपल्या मुख्यमंत्रीपदाचा दावा कायम ठेवू शकतात. भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास नाराजी दर्शवली, तर ते फेरनिवडणुकीची तयारीही दाखवू शकतात.

Bihar Election 2020: काँग्रेसला जास्तीच्या जागा दिल्याने RJDला फटका?

प्रादेशिक पक्षांना खाऊन टाकण्याची भाजपची प्रथा

सध्याच्या कलांनुसार भाजप 72 जागांवर तर जेडीयू 47 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने आजवर प्रादेशिक पक्षांना हाताशी धरुन अनेक राज्यांत आपले राजकारण सुरु केले. मात्र, कालांतराने त्याच पक्षांची कोंडी करत त्यांच्यावर वरचष्मा गाजवायचा, असेच भाजपाचे लाँग टर्म धोरण राहिले आहे. महाराष्ट्रात देखील शिवसेना हा मोठा भाऊ होता. मात्र, कालांतराने भाजपने मोठा भावाच्या जागेवर आपला दावा केला. अगदी याच पद्धतीने बिहारमध्येही भाजपला राजकारण करायचं असल्याचं बोललं जातंय. 

(सौजन्य- द प्रिंट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com