PM मोदींबद्दल अपशब्द बोलू नका; तेजस्वीं यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकाल हाती येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात प्रोटोकॉलनुसार जास्त बूथवर मतदान घेण्यात आलं होतं.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकाल हाती येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात प्रोटोकॉलनुसार जास्त बूथवर मतदान घेण्यात आलं होतं. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त 25 टक्के मतमोजणी झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाने त्यांच्या कार्यकर्त्यांना निकाल पूर्ण लागेपर्यंत मतमोजणी केंद्रावरून निघू नये असं सांगितलं आहे. 

आम्ही सर्व मतदारसंघातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. सर्व जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार आपण जिंकू शकतो. महागठबंधनचे सरकार येणार हे नक्की आहे. बिहारमध्ये बदल होणार आहे. सर्व उमेदवार आणि काउंटिंग एजंट मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी केंद्रातच रहा असं पक्षाच्यावतीने सांगण्यात आलं आहे. 

हे वाचा - Bihar Election : दोन जागांचे निकाल जाहीर; जेडीयु, आरजेडीला प्रत्येकी एक जागा, राष्ट्रवादीला ४९ हजार मते

मतमोजणीला सुरुवात होण्याआधी तेजस्वी यादव यांनी घराबाहेर कार्यकर्त्यांना बोलावलं होतं. त्यावेळी काही सूचना त्यांनी केल्या. यामद्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरू नका अस स्पष्टपणे बजावलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, मी पाहिलं की अनेक नेत्या कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलत आहेत. हे योग्य नाही.अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असेही तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचं दिसत आहे. एनडीए आघाडीवर दिसत असली तरी अद्याप 25 टक्केसुद्धा मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे इतक्यात आकडेवारीवरून अंदाज बांधणे घाईचे ठरू शकते.  एनडीए एकूण 131 जागी आघाडीवर आहे. तर महाआघाडीला 102  जागांवर आघाडी मिळाली आहे.  जेडीयूकडे सध्या  46 जागांवर आघाडी आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत.

हे वाचा - Bihar Election: CM पदाची स्वयंघोषित दावेदार पुष्पम प्रिया दोन्ही जागांवर पिछाडीवर; EVM हॅकचा दावा

जदयूच्या जागा कमी झाल्या असून यामुळे आता राज्यात नेतृत्व कोणाकडे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप मोठा पक्ष ठरल्यास नेतृत्व ठरवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं की, सरकार स्थापनेबाबत आणि नेतृत्वाचा निर्णय सांयकाळी जाहीर केला जाईल. तर दुसरीकडे मुख्यमंत्री नितिशकुमार हे आधीच ठरलं असताना चर्चा का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election tejaswi yadav says dont talk anything rubbish about pm modi