बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? नितीश कुमार यांनी दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर एनडीएची सत्ता कायम राहणार हे निश्चित झालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीरपणे काही सांगण्यात आलं नसल्यानं वेगवेगळी चर्चा होत आहे.

पाटणा - बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर एनडीएची सत्ता कायम राहणार हे निश्चित झालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीरपणे काही सांगण्यात आलं नसल्यानं वेगवेगळी चर्चा होत आहे. एनडीएमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून जदयू तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे कमी जागा असतानाही नितिश कुमार मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? आणि स्वीकारलं तर ते त्यांच्यासाठी अपमानास्पद असेल अशी टीकाही विरोधकांनी केली आहे. 

बिहार विधानसभेच्या निकालात एनडीएने बहुमत प्राप्त केल्यानंतर आता वेध लागले ते सरकार स्थापनेचे. नितीशकुमार येत्या सोमवारी किंवा आठवडाभरात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. मात्र शपथविधीबाबत अजुन काहीचं ठरलेलं नाही. दिवाळीला होणार की छठला याबाबत काही ठरवलेलं नाही. सध्या निवडणूक निकालाची समीक्षा केली जात आहे. चारही पक्षाचे नेते उद्या बैठक घेणार असल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली. लोकांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे आणि एनडीए सरकार स्थापन करेल असंही नितीश कुमार यांनी सांगितलं 

 

मुख्यमंत्री कोण असेल याबाबत विचारले असता नितीश कुमार म्हणाले की, मी कोणताही दावा केलेला नाही. याबाबतचा निर्णय एनडीए घेईल. 

दिवाळीतच येत्या सोमवारी भय्या दूजच्या दिवशी नितीशकुमार शपथ घेऊ शकतात, अशी जोरात चर्चा आहे. मात्र अजुनही त्याबाबत जाहीरपणे कोणी सांगितलेलं नाही. त्यांच्या शपथविधीबाबत राजभवनाशी अद्याप कोणताही संपर्क साधला गेलेला नसल्याचे सूत्राने सांगितले.

नव्याने शपथ घेण्यापूर्वी ते सध्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर करतील. एनडीएचे निर्वाचित आमदार हे नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करतील आणि नंतर शपथविधीचा मार्ग मोकळा होईल. यानुसार जेडीयूच्या मुख्यालयात नितीशकुमार हे निर्वाचित आमदारांची लवकरच भेट घेतील. यादरम्यान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीनिवास यांनी विजयी उमेदवारांची यादी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे सादर केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election who will be next cm nitish kumar answered