बिहारमधील "पुराचं पाणी' नेत्यांनी ढवळीलं

उज्ज्वलकुमार
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप

पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी गेला असताना राजकीय नेते मात्र परस्परांवर चिखलफेक करण्यात व्यग्र आहेत. राज्यातील बहुतांश भागांतील पूर ओसरला असला, तरीसुद्धा लोकांचे हाल मात्र कमी झालेले नाहीत. राज्यातील बड्या नद्यांचा पूर अद्याप ओसरला नसल्याने लोकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पुरेशी जागाही उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील 38 पैकी 20 जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला आहे.

आज राज्य विधिमंडळामध्ये राज्यातील पुरस्थिती आणि "सृजन' गैरव्यवहाराचे पडसाद उमटले. राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी गोंधळ घातल्याने दिवसभर सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. पुराला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे. राज्य सरकारने लोकांना देवाच्या भरोशावर सोडले होते, त्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचे तेजस्वी यांनी नमूद केले.

लालूंना टोला
राज्याचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीही राष्ट्रीय जनता दलावर प्रतिहल्ला केला, लालूप्रसाद यांनी 27 ऑगस्ट रोजी होणारी पक्षाची रॅली रद्द करून मुलांना पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. बिहार संकटात असताना लालूप्रसाद यादव सभा घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. "राजद'च्या महासभेसाठी लालूंनी "भाजप भगाओ, देश बचाओ' असा नारा दिला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देखील या सभेत सहभागी होण्याची शक्‍यता आहे. राहुल यांनी सभेत जाण्यापूर्वी पूरग्रस्त भागाची पाहणी करावी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी त्यांना दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

मोदी बिहार दौऱ्यावर
बिहारमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्ट रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदी पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचे सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले. या वेळी मोदींकडून बिहारसाठी विशेष पॅकेजची घोषणा देखील केली जाऊ शकते. दुसरीकडे 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेसाठी राष्ट्रीय जनता दलाने पूर्ण ताकद लावली आहे. पाटण्यातील मुख्य रस्त्यांवर तेजस्वी यादव यांची बाहुबली पोजमधील पोस्टर्स लावण्यात आली आहेत. सध्या राजकीय वर्तुळामध्ये या पोस्टर्सची चांगलीच चर्चा आहे.

Web Title: bihar news bihar flood and politics