लालूंच्या शिक्षेवरून राजद-भाजप भिडले

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना झालेल्या शिक्षेवरून राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि भाजप यांच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप राजदने केला असून, भाजपने कायद्यानुसार ही शिक्षा झाली असल्याचे म्हटले आहे.

पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना झालेल्या शिक्षेवरून राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि भाजप यांच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप राजदने केला असून, भाजपने कायद्यानुसार ही शिक्षा झाली असल्याचे म्हटले आहे.

लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनी भाजपवर आरोप करताना माझ्या वडिलांविरुद्ध कट रचण्यात आला असून, त्यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांनी हा आरोप खोडून काढताना हे न्यायालयीन प्रकरण आहे आणि यावर टीका-टिप्पणी योग्य नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. पाप केल्याची शिक्षा तर मिळतेच, असेही ते म्हणाले.
राजद नेते शिवानंद तिवारी म्हणाले, की लालूंना एकाच प्रकरणात वेगवेगळ्या शिक्षा का दिल्या जात आहेत. सीबीआय या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात गेली आणि शिक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आला. लालू निर्दोष असल्याचे सर्वांनाच माहीत आहे.

बिहार कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष कौकम कादरी यांनी लालूंच्या कुटुंबाला जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला, तर संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी म्हणाले, की लालूंना अडकवले असल्याचा आरोप निराधार आहे. हे न्यायालयीन प्रकरण आहे. लालूंची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. बिहार सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते नंदकिशोर यादव यांनी "जैसी करनी वैसी भरनी' अशा शब्दांत टोला हाणला.

ज्या काळात हे प्रकरण घडले त्या वेळी भाजपचे सरकार होते का? भाजपवर आरोप करणाऱ्यांनी ज्यांचे सरकार होते, त्यांना विचारावे. त्याऐवजी राजद त्यांच्या गळाभेटी घेऊन आघाडी बनवत आहे.
- गिरिराज सिंह, भाजप नेते

लालूप्रसाद यादव हे सामाजिक न्याय आणि जातीय सलोख्याला विरोध करणाऱ्या लोकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपसारख्या राजकीय पक्षांनी रचलेल्या कटाचे बळी ठरले आहेत.
- मनोज झा, राजद नेते

Web Title: bihar news lalu prasad yadav penalty and politics