नितीशबाबूंचे नवे सरकार जास्त कलंकित

उज्ज्वलकुमार
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

76 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले

पाटणा: भ्रष्टाचार व गुन्हेगारी खटल्यांच्या नावाखाली नैतिकतेचा आधार घेत लालूप्रसाद यादव यांच्याशी काडीमोड घेऊन बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार बनविलेल्या नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील 76 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहेत. विशेष म्हणजे नितीशबाबू या वेळी गेल्यावेळीपेक्षा अधिक कलंकित सरकार घेऊन सत्तारूढ झाले आहेत.

"नॅशनल इलेक्‍शन वॉच' या संस्थेने आज याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करून नितीशकुमार यांच्या नैतिकतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात ते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह 29 मंत्री आहेत. या 29 जणांच्या मंत्रिमंडळात गुन्हेगारी खटले दाखल असलेल्यांचाच सर्वाधिक भरणा असल्याचे या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे बिहारमधील आधिच्या लालूप्रसाद यादव यांच्या राजद व कॉंग्रेसच्या साथीने केलेल्या महाआघाडीच्या सरकारमध्ये अशा मंत्र्यांची संख्या तुलनेने कमी होती. गमतीचा भाग म्हणजे राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव व तेव्हाचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरील गैरव्यवहारांच्या आरोपांचे कारण देत नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता नितीशकुमार पुन्हा अशाच गुन्हेगारी स्वरुपाचे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत.

नव्या सरकारमधील नऊ मंत्र्यांचे शिक्षण आठवी ते बारावीपर्यंत झाले आहे. तर 18 मंत्र्यांचे शिक्षण पदवी वा त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहे. गेल्या मंत्रिमंडळात दोन महिला होत्या, तर आता एकच महिला मंत्री आहे. मात्र, या सरकारमध्ये कोट्यधिशांची संख्या 22 वरून 21 झाली आहे. या 29 मंत्र्यांची सरासरी संपत्ती सुमारे अडीच कोटी रुपये आहे.

22 जणांवर खटले
"नॅशनल इलेक्‍शन वॉच'च्या अहवालानुसार "जेडीयू - भाजप - लोजप' या पक्षांच्या सध्याच्या नव्या सरकारमधील 29 पैकी 22 मंत्र्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नितीशकुमार यांच्या गेल्या वेळच्या मंत्रिमंडळात 28 पैकी 19 मंत्री कलंकित होते. मुख्यमंत्र्यांसह अन्य 29 मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा अहवाल बनविण्यात आला आहे. त्यानुसार, 22 मंत्र्यांपैकी नऊ जणांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: bihar news nitish kumar new government